मुंबई : महाराष्ट्रात ई-सिगारेटवर बंदी आहे. मात्र तरिही ही बंदी झुगारून सर्रासपणे ई-सिगारेट विक्रीचा काळा बाजार सुरु असल्याचं अधोरेखित झालं आहे. ई-सिगारेटीविरोधात बांगूर नगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे. तसंच तब्बल 15 हून अधिक ई-सिगारेटची पाकिटंही जप्त करण्यात आली आहे. आता अटक करण्यात आलेल्या आरोपीची बांगूर नगर पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे.
मालाड येथील बांगूर नगर पोलिसांनी ई-सिगारेट विकल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी मालाड पश्चिम आणि बांगूर नगर भागातील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणांना अंमली पदार्थांच्या आहारी आणत होतं.
पोलिसांनी सांगितलं की, 5 डिसेंबर रोजी बांगूर नगर पोलिसांना काही लोक नशेसाठी ई-सिगारेट विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरेंद्र चौरसिया नावाचा हा व्यक्ती बांगूर नगर पोलिसांना ई-सिगारेट विकताना दिसला.
पोलिसांनी सुरेंद्र चौरसिया याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून महाराष्ट्रात बंदी असलेल्या ई-सिगारेटची एकूण 15 पाकिटे सापडली. जप्त करण्यात आलेल्या ई-सिगारेटच्या पाकिटांची किंमत 15 हजार रुपये असल्याचं सांगितलं जातंय.
सध्या पोलिसांनी आरोपीला अटक करत ई-सिगारेटचा काळा बाजार आणखी कुठे कुठे आणि कसा सुरु आहे, याचा कसून तपास सुरु केला आहे. याप्रकरणी इतरही काही जणांना अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. महाराष्ट्रात बंदी असूनही नेमक्या कुणाच्या आशीर्वादाने ई-सिगारेटच्या विक्रीचा गोरखधंदा सुरु आहे, असाही सवाल उपस्थित केला जातोय. या प्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हानही पोलिसांसमोर उभं ठाकलंय.