या जगात माणुसकी शिल्लक आहे का? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी घटना मुंबईलगतच्या एका शहरात घडली आहे. या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र अशी ख्याती आहे. पण याच महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या जवळच्या वसई शहरात अशाप्रकराची घटना घडणे यापेक्षा लाजिरवाणी कोणतीच गोष्ट असू शकत नाही. वसईत भर दिवसा रहदारीच्या रस्त्यावर एका 20 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली. या मुलीचा तसा काहीच दोष नव्हता. तिचा फक्त दोष इतकाच होता की, तिचं आरोपीवर प्रेम होतं. आरोपीने तिच्या प्रेमाची जाणीव ठेवली नाही. याउलट त्याने भर रस्त्यात तिची निर्घृणपणे हत्या केली. प्रेम ही भावना फार वेगळी असते. प्रेमात फार समर्पण, संवेदनशीलपणा, जाणीव असावी लागते. पण आरोपीला याबाबतचं ज्ञान कधी मिळालं नसावं. आरोपीने तिची हत्या केली. विशेष म्हणजे मुलीचा जीव वाचू शकला असता. कारण घटना घडली तेव्हा अनेक जण तिथे उपस्थित होते. अनेक लोक रस्त्याने ये-जा करत होते. काही जण फक्त बघ्याची भूमिका घेऊन उभे राहिले होते. काही जणांनी तर घटनेचा व्हिडीओ बनवणं पसंत केलं. पण कुणीही त्या मुलीला वाचवण्यासाठी पुढे गेलं नाही. त्यामुळे या मुलीला जीव गमवावा लागला. अतिशय लाजिरवाणी घटना आहे.
वसईत प्रियकराने प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना वसईत घडली. विशेष म्हणजे आरोपीने हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती यादव (वय 20) असं हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. आरोपीने प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी पाना मारून तिची हत्या केली. विशेष म्हणजे हत्या करताना बघ्यांची मोठी गर्दी केलेली होती. पण कोणीही तिला सोडवले नाही. याउलत काहींनी घटनेचा व्हिडीओ बनवला. त्या व्हिडीओत कुणीच तरुणीच्या मदतीला धावून गेले नाहीत, असं दिसत आहे. सध्या आरोपीला वाळीव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
आरोपीने प्रेयसीची हत्या का केली? या मागचं कारण आता समोर आलं आहे. पोलिसांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. मृत तरुणी आणि तिची हत्या करणारा तिचा प्रियकर यांच्यात सातत्याने भांडण सुरु होतं. तरुणीचं दुसऱ्या कुणासोबत प्रेम प्रकरण सुरु आहे, असा संशय आरोपी प्रियकराला होता. त्यातून दोघांमध्ये भांडणं सुरु होती. याच भांडणातून आरोपीने तरुणीची हत्या केली. आरोपीने प्रेयसीचा राग मनात धरुन एक मोठ्या इंडस्ट्रीयल पान्याने मुलीच्या डोक्यात मारुन तिची हत्या केली. या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्य झाला. याप्रकरणी हत्येचा कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. “मी लोकांना आवाहन करतो की, अशा घटना घडल्या तर लगेच पुढे जायला हवं. मुलीचा जीव वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजे. दुर्देवाने तसा प्रकार झाला नाही. नाहीतर कदाचित मुलगी वाचली असती”, अशी प्रतिक्रिया वसईच्या वाळवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. “दिवसाढवळ्या एखाद्या तरुणीची अशा पद्धतीने हत्या होते आणि लोक बघत राहतात. दहा-पंधरा लोक आजूबाजूने जात आहेत. पण नुसतेच बघत आहेत. हे सगळं चित्र विदारक आहे. मुलीच्या मदतीसाठी एकही माणूस जात नाही. एक माणूस जाताना दिसतोय. पण त्याची शक्ती कमी पडताना दिसतेय इतका तो इसम रागात असावा. मुंबई लगतच्या भागात अशाप्रकारची घटना घडते तेव्हा पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या शहरालगत इतकी गंभीर आणि भयंकर घटना घडणं हे महाराष्ट्रातल्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणार आहे”, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.