मुंबई : मुंबईच्या दहिसर (Dahisar News) पूर्व भागात असलेल्लाय मागाठाणे (Magathane) विभानसभा मतदारसंघात रविवारी रात्री राडा झाला. दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात प्रत्येकी एक जण जखमी झाला आहे. तर हाणामारीप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा नोंदवून घेण्यात आला असून पोलिसांडून अधिक तपासही केला जातोय. दरम्यान, दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणाचं कारण सुरुवातीला राजकीय (Maharashtra Politics) असल्याची चर्चा होती. मात्र तसं नसून हा राडा अराजकीय कारणामुळे झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मागाठाणेमध्ये झालेल्या राड्यात लढलेल्या दोन गटांपैकी एक गट हा शिवसेनेशी संबंधित आहे, तर दुसरा गट हा आमदार प्रकाश सुर्वे यांचा समर्थक गट म्हणून ओळखला जातो. दोन्ही गट यादव समाजाचे असून ते शेजारी राहत राहतात. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या राड्यमागे राजकीय कारण नसून हा परस्पर वाद असल्याचं समोर आलंय. मुंबई पोलीस झोन 12 चे डीसीपी सोमना घार्गे यांनी याबाबतची माहिती दिलीय.
मुंबई पोलीस झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी एका ग्राहकावरून दोन्ही गटात वाद आणि भांडण झाले होते. मात्र प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले नाही.दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारामारीवरून रविवारी रात्रीही दोन्ही गटातील लोकांमध्ये मारामारी झाली. दोन्ही गटातील प्रत्येकी एक – एक जण जखमी झाला आहे. सध्या दहिसर पोलीस दोन्ही बाजूंच्या लोकांविरुद्ध क्रॉस एफआयआर नोंदवून अधिक तपास करत आहेत, असंही घार्गे यांनी सांगितलं.
दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी यापूर्वी मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थकावर मारहाणीचा आरोप करून राजकारण जोडण्याचा प्रयत्न केला होता. पोलिस ठाण्यात गेल्यावर शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी दोघांना झालेल्या दुखापतींबाबत बोलण्यास सुरुवात केली आणि पोलिसांकडून निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.
राज्यात सुरु असलेल्या शिवसेना विरुद्ध शिंदे गट या राजकीय वादळात अनेक शिवसैनिकांवर हल्ले, मारहाणी आणि कार्यकर्त्यांमध्ये होणारे अंतर्गत वाद वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. त्या पार्श्वभूमीवर हा राडा झाला असावा अशीही शंका सुरुवातीला व्यक्त केली जात होती. मात्र तसं काहीही नसल्याचं अखेर पोलिसांनी स्पष्ट केलंय. पोलिसांनी हा परस्पर वाद असल्याचे सांगत दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.