मुंबई : उच्चभ्रू कुटुंबातील महिला आणि गृहिणी यांची ड्रग्जच्या व्यवसायातील (Women and ladies in drugs trafficking) भागीदारी वेगाना वाढताना दिसत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (Narcotics Control Bureau- NCB) कारवायांच्या आकडेवारीमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनसीबीने वर्षभरात 230 जणांवर कारवाई केली. यामध्ये 1 हजार 791 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आरोपींमध्ये पॉश घरांमध्ये राहणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. ड्रग्जसंबंधी व्यवसायात 15 महिला आरोपी आहेत.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या हवाल्याने काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्जच्या व्यवसायात महिलांचा सहभाग नवीन नाही. फरक एवढाच आहे, की आता उच्चभ्रू घरातील महिलाही अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी होत आहेत. अंमली पदार्थ तस्करांपैकी 10 ते 15 टक्के महिला तस्कर समोर आल्या आहेत. झटपट पैसे मिळवण्याच्या नादात या अवैध धंद्यात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत.
अनेक वेळा या महिलांवर कारवाई करणे खूप अवघड असते. अंमली पदार्थांच्या व्यवसायात असलेल्या या महिला कारवाई टाळण्यासाठी विविध डावपेचांचा वापर करतात. मुंबईतील नागपाडा येथील रहिवासी हुसेन बी (41) हिच्याकडून जुलै महिन्यात एनसीबीने 1.8 किलो ड्रग्ज जप्त केले होते. कोणावरही संशय येऊ नये म्हणून हुसैन बी तिच्या 13 वर्षाच्या मुलाचा या कामासाठी वापर करत होती. त्याचप्रमाणे सप्टेंबरमध्ये एनसीबीने गुजरातमधून रुबिना शेख नावाच्या महिलेलाही पकडले होते. तस्करीसाठी ती वेगवेगळे डावपेचही वापरत होती. जुलैपासून ती एनसीबीच्या रडारवर होती.
दरम्यान, परदेशात विशिष्ट प्रकारच्या ड्रग्जचा ट्रेंड वाढल्याचेही समोर आले आहे. अॅम्फेटामाइन असे या ड्रग्जचे नाव आहे. एनसीबीच्या कारवाईत दुबई, मालदीव, ऑस्ट्रेलियामध्ये अॅम्फेटामाइन नावाच्या ड्रग्जची मागणी प्रचंड वाढल्याचे समोर आले आहे. ही ड्रग्ज मुंबईत मोठ्या प्रमाणात तयार करून नंतर या देशांमध्ये विक्रीसाठी पाठवली जातात.
अंमली पदार्थांच्या तस्करीशी निगडीत आणखी एक बाब समोर आली आहे. ज्यामध्ये कुरिअर सेवेची भूमिका वाढत असल्याचे दिसून येते. कुरिअरद्वारे अंमली पदार्थांची तस्करी झाल्याची अनेक प्रकरणे या वर्षी समोर आली आहेत. एनसीबीच्या तपासात कुरिअर कंपनीने पाठवलेल्या ड्रग्जच्या पार्सलवर दिलेली नावे आणि पत्ते बनावट असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे कारवाई केल्यास आरोपींना पकडता येत नाही. या संपूर्ण रॅकेटमध्ये कुरिअर कंपन्यांचाही हात आहे, याचा तपास सुरू आहे.
संबंधित बातम्या :
“मी अहमदाबादचा पोलिस आयुक्त बोलतोय…” पुण्यात पोलिसांनाच गंडवणारा भामटा मुंबईत जेरबंद
सलमानकडे रिक्षा चालवण्याचं लायसन्स आहे का? काँग्रेस नगरसेविकेकडून कारवाईची मागणी
तेलंगणातून येत होता नागपुरात गांजा, बुटीबोरीत पोलिसांनी रचला सापळा; सात लाखांचा गांजा जप्त