मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह, रियाज पाटील अशी देखील नावं आहेत. विमल अग्रवाल नावाच्या एका व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्रवाल यांनी तक्रारीत परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“माझं पार्टनरशिपमध्ये गोरेगाव इथे BOHO रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये BCB स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि अन्य आरोपींनी 9 लाख रुपये घेतले होते. आरोपींनी जानेवारी- फेब्रुवारी 2020 पासून ते मार्च 2021 या काळात 9 लाखांची वसूली केली आहे”, असा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला आहे.
मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहिता नुसार 384 ,385 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी सुमित सिंह याला अटक केली आहे. बोरीवली कोर्टाने आरोपीला 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं आहे.
परमबीर सिंग यांच्यावर याआधी ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीने परमबीर सिंग यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात होता. परमबीर सिंह यांच्यासोबत संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि डीसीपी पराग मणेरे असे सहआरोपी आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक फूलपगारे करत आहेत.
याआधी, परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण (DCP Akbar Pathan) यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा श्याम सुंदर अगरवाल यांनी केला होता. त्यानंतर परमबीर सिंग यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.
हेही वाचा :
वर्दीला डाग, पोलीस हवालदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जिथे कार्यरत, त्याच पोलीस ठाण्यात बेड्या