मुंबईत फटका गँगच्या मुसक्या रेल्वे पोलिसांनी आवळल्या, चार महिन्यात एकच तक्रार

| Updated on: Aug 03, 2021 | 9:51 AM

फटका गॅंगच्या मुसक्या आवळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी ज्या परिसरात फटका गॅंग कार्यरत आहेत किंवा सातत्याने घटना घडत असतात अशा 15 रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पोलिसांची गस्त वाढवली

मुंबईत फटका गँगच्या मुसक्या रेल्वे पोलिसांनी आवळल्या, चार महिन्यात एकच तक्रार
MUMBAI LOCAL
Follow us on

अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : लोकल ट्रेनच्या दारात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचे मोबाइल लंपास करणाऱ्या फटका गँगच्या मुसक्या आवळण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. गेल्या अडीच वर्षात मध्य रेल्वे मार्गावर फटका गँगविरोधात तब्बल 597 गुन्हे नोंदवण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. मात्र रेल्वेने केलेल्या तीव्र कारवाईनंतर गेल्या चार महिन्यात मध्य रेल्वे मार्गावर फटका गँगविरोधात केवळ एकच गुन्हा उघडकीस आला आहे.

फटका गँगविरोधात तब्बल 597 गुन्हे

मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनमधून दररोज 70 लाखापेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. लोकल ट्रेनच्या प्रवासात अनेक प्रवासी दरवाजात उभे राहून प्रवास करताना. या दरम्यान अनेकांना मोबाईलवर बोलण्याची सवय असते, तर काही प्रवासी खांद्यावर बॅग लटकवून दरवाजात उभे राहतात. हे हेरुन रुळांजवळील खांब किंवा झुडपात लपून बसलेले चोर प्रवाशांच्या हातावर एखाद्या लोखंडी किंवा लाकडी काठीने जोरदार प्रहार करतात. प्रवाशाकडील वस्तू रुळावर पडताच ती लंपास करून चोर पसार होता.

या घटनांमुळे अनेक प्रवाशांचे प्राणही गेले आहेत. तर अनेकांवर कायमस्वरूपी दिव्यांग होण्याची वेळ आली आहे. 2019 मध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात फटका गँगविरोधात तब्बल 519 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर 2020 जानेवारी ते मार्च या तीन महिन्याचा कालावधीत फटका गँगच्या विरोधात तब्बल 70 गुन्हे नोंदवण्यात आले होते. म्हणजे प्रत्येक महिन्याला सरासरी 25 गुन्हे फटका गॅंगविरोधात दाखल होते. त्यामुळे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाची डोकेदुखी वाढली होती. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे मेपर्यंत लोकल बंद राहिल्या. जून 2020 पासून पुन्हा अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु झाल्या होत्या.

चार महिन्यात फक्त एकच गुन्हा

मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते जूनपर्यंत 2021 या सहा महिन्याच्या कालावधीत फटका गॅंगविरोधात 8 गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या फटका गँगवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफच्या संयुक्त कारवाईमुळे गेल्या चार महिन्यात फटका गॅंगविरोधात एकच गुन्हा दाखल झालेला आहे.

रुळाजवळ शंभर जवान नियुक्त

फटका गॅंगच्या मुसक्या आवळण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी ज्या परिसरात फटका गॅंग कार्यरत आहेत किंवा सातत्याने घटना घडत असतात अशा 15 रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पोलिसांची गस्त वाढवली. ज्यामध्ये लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफचे मिळून 100 जवानांना नियुक्त केले आहे. याशिवाय रुळाजवळील झोपड्यांमध्ये वास्तव्य असणारे गुन्हेगार व त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेतली जात आहे. तसेच एखादी संशयित व्यक्ती दिसताच त्यालाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची माहिती सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली आहे.

कोणकोणत्या भागात फटका गँग सक्रिय?

मध्य रेल्वेवरील वडाळा स्थानक, जीटीबी नगर स्थानक, किंग्ज सर्कल, माहिम, कोपरखैरणे, ऐरोली, रबाळे, कल्याण, कोपर, सॅन्डहर्स्ट रोड स्थानक, डोंबिवली, ठाणे, नाहूर, ठाकुर्ली, पारसिक बोगदा, कोपरी ब्रिज यासह अन्य काही ठिकाणी फटका गँग कार्यरत आहे. या ठिकाणी फटका गँगविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामुळे या परिसरात लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहेत. तसेच रेल्वे सुरक्षा दलाकडून नियमित पेट्रोलिंग केली जात आहे.

जनजागृतीची उद्घोषणा

लोकलमधून प्रवास करताना अनेक जण डब्यातील दरवाजाजवळ उभे राहतात. यात काही प्रवासी मोबाइलवर बोलतात, तर काही जण आपल्याजवळील बॅग बाहेरच्या दिशेने ठेवून प्रवास करतात. अशा प्रकारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका गँगकडून धोका होऊ शकतो आणि त्यामुळे सुरक्षितरित्या प्रवास करण्याचे आवाहन करणारी उद्घोषणा लोकलमध्ये केली जाते. विशेष म्हणजे ज्या परिसरात फटका गॅंग आहे त्या परिसरातून लोकल ट्रेन जात असताना याविषयी उद्घोषणा करुन प्रवाशांना सतर्क केले जात असल्याची माहिती जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली आहे.

कशी असते मोडस ऑपरेंडी?

रेल्वे रूळालगत असलेल्या परिसरात फटका गँगचे सदस्य राहतात. रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या खांबावर या टोळीचे काही सदस्य हातात काठी, रॉड घेऊन खांबाच्या आड लपून बसतात. ट्रेन येताच हे धावत्या ट्रेनच्या दरवाजात उभे असलेल्या प्रवाशांना टार्गेट करून त्यांच्या हातावर काठी किंवा रॉडचा फटका मारून प्रवाशाच्या हातातील वस्तू खाली पाडतात, त्यानंतर खाली उभे असलेले टोळीचे इतर सदस्य खाली पडलेली वस्तू घेऊन पसार होतात.

संबंधित बातम्या :

लोकलमध्ये मंत्रालय कर्मचाऱ्यावर महिलेसह चौघांचा हल्ला, प्रवाशानेच बहादुरीने एकाला पकडले

मोबाईल चोरासोबत झटापट, लोकलखाली येऊन ठाण्यात विवाहितेचा मृत्यू, आरोपीला अखेर अटक

(Mumbai Local Central Railway successful in seizing Fatka Gang in last 4 months)