गोविंद ठाकूर, Tv9 मराठी, मुंबई | 30 डिसेंबर 2023 : मुंबई पोलिसांच्या हातून गुन्हेगारांनी पळून जाणं हे शक्य होणार नाही. पोलीस सातत्याने गुन्हेगारांच्या मागावार असतात. गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी मुंबई पोलीस सतर्क असतात. येत्या 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी हजारो पोलीस कर्मचारी मुंबईच्या कानाकोपऱ्यात तैनात असणार आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारांवर वचक ठेवणाऱ्या धडाकेबाज मुंबई पोलिसांच्या आणखी एका कामगिरीची सध्या कांदिवलीत जोरदार चर्चा होत आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या 20 वर्षांपासून फरार असलेल्या एका कुख्यात आरोपीला शोधून काढलं आहे. त्याच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
मुंबई पोलिसांनी एका कुख्यात आणि फरार आरोपीला तब्बल 20 वर्षांनंतर अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या आरोपीचा मृत्यू झाला असं मानत खटला देखील बंद केला होता. पण अचानक 20 वर्षांनी पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला आणि त्यांनी वॉन्टेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या आरोपीचं नाव दीपक नारायण भिसे असं आहे. तो गेल्या 20 वर्षांपासून बेपत्ता होता. पोलिसांना वाटलं की त्याचा मृत्यू झालाय. त्यामुळे दीप भिसे याची फाईल बंद करण्यात आली होती. या दीपक भिसेवर खून, अर्ध खून, मारामारी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. या भिसेला आता अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सध्या दीपक भिसे याचं वय 62 वर्षे इतकं आहे.
कांदिवली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक नारायण भिसे याच्याविरुद्ध अनेक एफआयआर दाखल करण्यात आले होते. तसेच न्यायालयात खटला सुरू होता. पण 2003 मध्ये आरोपीने कोर्टात येणं बंद केले होते. त्याचा कोणाशीही संपर्क नव्हता. तो पत्नीला भेटायलाही येत नव्हता. तो नालासोपारा नाव, गाव बदलून, ओळख बदलून राहत होता. न्यायालयाने आरोपीला वॉन्टेड घोषित करून खटला बंद केला होता. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनंतर कांदिवली पोलिसांना दीपक भिसे याचा थांगपत्ता लागला. पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.