मुंबई : मुंबईत सध्या महिला चोरांची एक गँग सक्रिय आहे. या गँगमधील महिला ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये जाऊन दागिने विकत घेण्याच्या बहाण्याने दुकानदाराशी संपर्क साधतात आणि चोरी करून फरार होतात. अखेर या गँगमधील दोन महिला चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलीस आणखी तिसऱ्या महिलेचा शोध घेत आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या महिलांचे नाव सुगंधाबाई मकाले (वय 60 वर्ष) आणि उषाबाई मकाले (वय 58 वर्ष) असं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कांदिवली पोलीस करत आहेत (Mumbai Police arrest two woman who theft jewellers from Jewellery shops).
कांदिवली पश्चिमेतील मंगलमूर्ती ज्वेलर्स या दुकानात सोमवारी (21 जून) सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका पाठोपाठ तीन महिला आल्या. त्यांनी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. या तीन महिलांपैकी एका महिलेने दुकानदारास नाकातील नथनी दाखवण्यास सांगितलं. त्यानंतर तिने पायातील पैंजण दाखवण्यास सांगितलं. दुकानदार पैंजणाचं वजन करण्यासाठी गेला तेव्हा एका महिलेने पैंजण चोरी करुन साडीमध्ये लपवले. त्यानंतर ती दागिने विकत न घेता निघून गेली.
संबंधित महिलेसह इतर दोन महिलाही लागोलग दुकानात निघून गेल्या. थोड्या वेळाने दुकानदाराला महिलांवर संशय आला. त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिलांची चोरी निदर्शनास आली. त्याने तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. सीसीटीव्हीत महिलांची लाईव्ह चौरी कैद झालेली होती (Mumbai Police arrest two woman who theft jewellers from Jewellery shops).
कांदिवली पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपासाला सुरुवात केली. अखेर या गँगमधील दोन महिलांना अटक करण्यात कांदिवली पोलिसांना यश आलं. या महिलांची आणखी एक सहकारी फरार आहे. तिचाही शोध पोलीस घेत आहेत.
आरोपी महिला या नाशिकहून मुंबईमध्ये फक्त चोरी करण्यासाठी येत. ते दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये जात. तिथे दुकानदाराला फसवून चोरी करुन पसार होत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या महिलांनी अशाप्रकारे अनेक ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये चोरी केल्याचं उघड झालं आहे, अशीही माहिती आता समोर येत आहे.
हेही वाचा : विवाहबाह्य संबंधातून नागपुरात पत्नीच्या प्रियकराची हत्या, नाल्याचं पाणी लालेलाल