मुंबई: मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाकडून (CIU) पैशांचा अपहार केल्याप्रकरणी दिलीप छाब्रिया यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याने व्हॅनिटी व्हॅन बनवून घेण्यासाठी दिलेल्या पैशांच्या अपहार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
गेल्यावर्षी सचिन वाझे सीआययु पथकाचे प्रमुख असताना दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. छाब्रिया यांच्या डिसी अवंती स्पोर्ट्स कारमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे.याचवेळी कपिल शर्मा यानेही सीआययु पथकात त्याची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती. व्हॅनिटी व्हॅनसाठी कपिल शर्मा याने दिलीप छाब्रिया यांच्याशी व्यवहार केला होता. त्यावेळी आर्थिक देवाणघेवाण दिलीप छाब्रिया यांच्या मुलाच्या खात्यावर झाली होती. त्यामुळे आता पोलिसांनी छाब्रिया यांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.
कपिल शर्माच्या तक्रारीनुसार, त्याने दिलीप छाब्रिया यांच्याकडे 2017 साली एक व्हॅनिटी व्हॅन ऑर्डर केली होती. त्यासाठी कपिल शर्माने छाब्रिया यांना पैसेही देऊ केले होते. मात्र, दिलीप छाब्रिया यांनी कपिल शर्माला व्हॅनिटी व्हॅन दिलीच नाही. त्यामुळे कपिल शर्माने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
दिलीप छाब्रिया हे देशातील एक सुप्रसिद्ध कार डिझायनर आहेत. सेलिब्रिटी आणि श्रीमंत लोकांच्या कार डिझाईन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. शाहरुख खानची व्हॅनिटी व्हॅनही दिलीप यांनी डिझाइन केली होती. क्रिकेटर दिनेश कार्तिकनेही दिलीपविरोधात 2015 मध्ये गुन्हा दाखल केला होता. दिनेश कार्तिकचे म्हणणे होते की, दिलीप छाबरिया यांना पाच लाख रुपये देऊनही त्याने काम योग्य केले नसल्याचा आरोप होता.
डिझायनर कार खरेदी-विक्री आणि फायनान्स करुन अनेकांची कोट्यवधींना फसवणूक करण्याच्या कथित घोटाळ्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. हे रॅकेट देशातील अनेक राज्यात पसरल्याचा अंदाज आहे. या गुन्ह्यात दिलीप छाब्रिया यांना अटक करण्यात आली होती. दिलीप छाब्रिया डिझाईन्स प्राव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहेत.
दिलीप छाब्रिया यांना 28 डिसेंबरला एमआयडीसी अंधेरी येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना 2 जानेवारी 2021 पर्यंत पोलीस कोठड़ी सुनवण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. डिजाईनर कार कंपनी, वित्तीय संस्थान आणि इतर काही विभागाचे कर्मचारी, अधिकारी हे 42 कोटीपेक्षा अधिकच्या घोटाळ्यात सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लवकरच अनेकांना याप्रकरणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या:
डिझायनर कारप्रेमींना धक्का, मुंबई पोलिसांकडून मोठं रॅकेट उद्ध्वस्त, दिलीप छाबरियाला बेड्या
कपिल शर्मा मुंबई क्राइम ब्रँचच्या ऑफिसमध्ये, दिलीप छाबरियाविरोधात जबाब देणार!