Electricity bill | मुंबईत लाईट बिल भरण्याच्या नावाखाली एक महिलेची 1.37 लाखांना अशी झाली फसवणूक

| Updated on: Oct 03, 2023 | 3:13 PM

Electricity bill fraud | असा फोन कॉल तुम्हाला सुद्धा येऊ शकतो, त्यामुळे ही बातमी वाचून वेळीच सावध व्हा. नेमकं काय घडलं? लाईट बिल भरताना एक महिलेची इतकी मोठी फसवणूक कशी झाली?

Electricity bill | मुंबईत लाईट बिल भरण्याच्या नावाखाली एक महिलेची 1.37 लाखांना अशी झाली फसवणूक
Fraud Calls Online Fraud Cyber Crime
Follow us on

मुंबई : लाईट बिल भरण्यात मदत करतो सांगून एका सायबर घोटाळेबाजाने मुंबईत राहणाऱ्या एका 37 वर्षीय महिलेला 1.37 लाख रुपयांना फसवलं. पोलिसांनी सोमावारी ही माहिती दिली. अंधेरी पश्चिमेला महिला तिच्या आईसोबत राहते. आई ज्येष्ठ नागरिक आहे. वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. महिलेच्या आईच्या मोबाइलवर शुक्रवारी एक मेसेज आला. त्यात “रात्री 9.30 वाजेपर्यंत वीज बिल भरलं नाही, तर लाईट कापली जाईल” असं म्हटलं होतं.

मोबाइलवर आधी मेसेज आला. त्यानंतर तक्रारदार महिलेच्या 62 वर्षीय आईला घोटाळेबाजाने फोन केला. लाईट बिल भरलं नाही, तर वीज कापण्याची धमकी त्याने दिली. सायबर गुन्हेगाराने त्यानंतर तक्रारदार महिलेचा मोबाइल नंबर मिळवला व तिला व्हिडिओ कॉल केला. ऑनलाइन इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यासाठी मदत करण्याची घोटाळेबाजाने तयारी दाखवली. पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.

घोटाळेबाजाने असं फसवलं

मदत करण्याच्या नावाखाली घोटाळेबाजाने महिलेच बँक अकाऊंट आणि डेबिट कार्डाचे डिटेल मिळवले. त्यातून त्याने अनधिकृतपण व्यवहार करत 1.37 लाख रुपयांना महिलेची फसवणूक केली. तक्रारीच्या आधारावर अज्ञात व्यक्तीविरोधात FIR नोंदवण्यात आलाय. पुढील तपास सुरु आहे.