राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांचा काल गोळीबारात मृत्यू झाला आहे. काल मारेकऱ्यांनी डाव साधला आणि वांद्रे येथील निर्मल नगर बाहेरच डाव साधत सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोर फक्त बाबा सिद्दीकीच नव्हे तर त्यांचा मुलगा जीशान सिद्दीकी यांनाही मारणार होते. पण जीशान थोडक्यात बचावले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बाबा सिद्दीकी शनिवारी संध्याकाळी त्यांच्या वांद्रे येथील निर्मल नगरमधील ऑफिसमध्ये बसले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आमदार जीशान सिद्दीकीही होते. फटाके फोडून बाबा सिद्दीकी घरी जाणार होते. त्यामुळे ते सव्वा नऊ ते साडेनऊच्या सुमारास ऑफिसमधून बाहेर पडले. फटाके वाजवत असतानाच एक गाडी आली आणि त्यातून तिघे उतरले. या तिघांना तोंडाला रुमाल बांधलेला होता. गाडीतून उतरताच फटाक्याच्या आवाजात त्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. एकूण सहा राऊंड फायर कण्यात आले. त्यातील एक गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीवर लागली. त्यामुळे ते खाली कोसळले. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ धाव घेऊन बाबा सिद्दीकी यांना रुग्णालयात नेले. पण त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.
बाबा सिद्दीकी आणि जीशन सिद्दीकी सोबतच घरी जाणार होते. दोघेही कार्यालयाबाहेर पडले. पण तितक्यात जीशान यांना एक फोन आला आणि ते परत ऑफिसमध्ये फिरले. ऑफिसमध्ये बसूनच ते फोनवर बोलत होते. अचानक गोळीचा आवाज आला आणि ते बाहेर आले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. जीशान सिद्दीकी यांना फोन आला नसता तर त्यांचा तिथेच गेम झाला असता असं सूत्रांनी सांगितलं. अवघ्या पाच मिनिटातच हा खेळ खल्लास झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
जीशान सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा आहे. बाबा सिद्दीकी यांच्याकडे वाय दर्जाची सुरक्षा नव्हती. 15 दिवसांपूर्वी जीशन सिद्दीकी यांना धमकी आली होती. त्यानंतर जीशान यांना वाय दर्जाची सेक्युरिटी देण्यात आली होती. ज्यावेळी गोळ्या घालण्यात आल्या तेव्हा जीशान सिद्दीकी यांची गाडी पुढे होती आणि बाबा सिद्दीकी यांची गाडी मागे होती.
बाबा सिद्दीकी यांच्यावर सहा राऊंड फायर करण्यात आले आहे. फायरिंगसाठी 9.9 एमएमच्या पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी ही पिस्तुल जप्त केली आहे. तसेच घटनास्थळावरून पोलिसांनी काडतुसेही जप्त केली आहेत. त्याची तपासणी करण्यात येणार आहे. या प्रकऱणाचा पोलीस प्रत्येक अँगलने चौकशी केली जात आहे.