ncp leader baba siddique murder: माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या झाली. त्यांना वाय दर्जाची सुविधा असताना त्यांची हत्या कशी झाली? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान या हत्या प्रकरणावरुन सत्ताधारी गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. दुसरीकडे विरोधक सरकारवर बरसले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला पाच प्रश्न विचारले आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील गृह खात्याबद्दल काही प्रश्न उभे राहिले आहेत, असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे. स्वतःला काडतुस-काडतुस म्हणून घेणाऱ्या गृहमंत्र्यांना आता लोकही फडतूस म्हणू लागले आहेत. महाराष्ट्रातील पक्षफोडीचे मास्टरमाईंड आणि अधूनमधून गृहमंत्री असलेल्या या माणसावर आणि त्याच्या खात्यावर सामान्य जनतेला काडीचा विश्वास उरलेला नाही, असा हल्ला दानवे यांनी केला आहे. त्यांनी पाच प्रश्न उपस्थित केले आहे.
बाबा सिद्धिकी यांची हत्या केली जात असताना त्याची माहिती गुप्तचर यंत्रणेस मिळाली नाही, गुप्तचर यंत्रणा काय काम करते. पोलिसांचे हात बांधलेले आहेत. त्यांनी त्या चाळीस आमदारांना फुकटची सुरक्षा दिली. त्यांच्या त्या सुरक्षेला कुत्रे विचारत नाही. यासंदर्भात राज्य शासनाचे मंत्री छगन भुजबळ जे बोलले, ते योग्य आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, माझी स्वत:ची त्यांच्याशी मैत्री होती. आम्ही सोबत काम केले आहे. दोन आरोपी पकडले गेले आहे. चौकशी सुरू आहे. काही धागेदोरे मिळत आहेत. काही अँगलही मिळत आहेत. त्यावर आता जास्त बोलणे योग्य नाही.
बाबा सिद्दिकी हे मुंबईतील एक ज्येष्ठ नेते आहेत. परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावर गोळ्या घातल्या गेल्या. आता सर्व तपासानंतर जी माहिती समोर आली, त्यानुसार दोन दोन महिने आधी आरोपी येऊन थांबले. बाबा सिद्दिकी यांना वाय प्लस सुरक्षा असताना देखील गोळ्या घालणं म्हणजे त्यांच्या सुरक्षा विषयी शंका उपस्थित करणार आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना गोळ्या घालणं हे त्यापेक्षाही महाभयानक आहे. आम्ही ज्या वेळेस कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलतो त्यावेळेस राजकारण केलं जातं असं सत्ताधारी म्हणतात. त्यामुळे राज्यातले गृहमंत्री फुल टाईम आहेत का? असाही प्रश्न आता उपस्थित होतोय. महाराष्ट्रातील गुप्तचर आणि गुप्तहेर यंत्रणा काय काम करते. त्यामुळे आताच्या घडीला गृहमंत्री हेच बेपरवा असल्याची स्थिती आहे, असा अंबादास दानवे यांनी म्हटले.