NCRB | महाराष्ट्रातून गेल्या वर्षी 63 हजार महिला बेपत्ता, 183 जणींची अनैतिक संबंधांतून हत्या : अहवाल

| Updated on: Dec 22, 2021 | 12:12 PM

महाराष्ट्रात गेल्या वर्षी 2 हजार 163 हत्येच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये 564 महिलांचा समावेश होता. त्यापैकी 116 जणींची प्रेम प्रकरणातून, तर 183 जणींची अनैतिक संबंधांतून हत्या झाल्याची माहिती आहे

NCRB | महाराष्ट्रातून गेल्या वर्षी 63 हजार महिला बेपत्ता, 183 जणींची अनैतिक संबंधांतून हत्या : अहवाल
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

मुंबई : गेल्या वर्षी (2020) महाराष्ट्रातून तब्बल 63 हजार महिला बेपत्ता (Missing Women) झाल्या होत्या. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून ही हादरवणारी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी जवळपास 23 हजार महिलांविषयीचे गूढ अद्यापही कायम आहे. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काळजी व्यक्त केली जात आहे.

प्रेम प्रकरणातून किती हत्या

महाराष्ट्रात गेल्या वर्षी 2 हजार 163 हत्येच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये 564 महिलांचा समावेश होता. त्यापैकी 116 जणींची प्रेम प्रकरणातून, तर 183 जणींची अनैतिक संबंधांतून हत्या झाल्याची माहिती आहे. हुंडाबळी गेलेल्या महिलांचे प्रमाणही लक्षणीय असल्याची माहिती आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षात महिलांविरोधातील सर्वाधिक गुन्हे (49 हजार 385) उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले होते. यामध्ये खून, बलात्कार, लैंगिक अत्याचार, विनयभंग, अपहरण, हुंडाबळी यासारख्या विविध गुन्ह्यांचा समावेश होतो.

महाराष्ट्राचा चौथा क्रमांक

महिलांविरोधातील गुन्ह्यांत यूपीनंतर पश्चिम बंगाल (36 हजार 439) आणि राजस्थान (34 हजार 535) यांचा क्रमांक लागतो. तर या यादीत महाराष्ट्र (31 हजार 954) चौथ्या स्थानावर आहे. आदल्या वर्षीच्या म्हणजेच 2019 च्या तुलनेत राज्यातील महिलांविरोधी गुन्ह्यांचा आकडा 5 हजार 190 ने घटले आहे.

मुंबईत 999 अल्पवयीन मुलींचे अपहरण

2021 वर्षातील पहिल्या 11 महिन्यात मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणी 999 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी 859 गुन्ह्यांची उकल झाली आहे. मात्र 140 बेपत्ता मुलींचं गूढ अजूनही कायम आहे.

आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील सर्वाधिक व्यक्ती बेपत्ता आहेत. त्यांची संख्या एक लाख 9 हजार 585 च्या घरात आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील 63 हजार 252 महिला बेपत्ता झाल्या असून 23 हजार 157 जणींचा शोध अजूनही लागलेला नाही. दीड हजार अल्पवयीन मुलींचा यात समावेश असून काही जणी प्रेम प्रकरणातून पळून गेल्याचं बोललं जातं.

संबंधित बातम्या :

शिक्षणासाठी वडिलांनी थांबवल्याच्या रागातून 24 वर्षीय तरुणीने इमारतीवरून उडीमारत केली आत्महत्या

वाळू चोरी करताना ट्रॉली उलटली, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण गंभीर

मास्कमध्ये मोबाईल, पुण्यात पोलिस भरती परीक्षेत ‘मुन्नाभाई’ स्टाईल कॉपी, मास्क बनवणारा कॉन्स्टेबल जेरबंद