पालघर : महिलादिनाच्या पूर्व संध्येला नालासोपा-यात धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून गळफास लावून घेतला आणि आपलं आयुष्य संपवलंय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 21 वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेतलाय. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी शारीरिक, मानसिक, छळ करत मारहाण केल्यामुळे आत्महत्या केली असल्याचा आरोप आता विवाहितेचा कुटुंबीयांनी केला आहे. नालासोपारा पूर्व इथल्या पेल्हार परिसरात सोमवारी रात्री 9 च्या सुमारास राहत्या घरात विवाहितेनं गळफास घेतला. याबाबत पेल्हार पोलीस ठाण्यात आत्महत्या केलेल्या तरुणीचा पती, तिचे सासरे आणि नणंदेचा पती अशा तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पती आणि नणंदेचा नवरा अशा दोघांना अटक केली असून सासरा फरार आहे.
प्रितम अनिलकुमार यादव वय 21 असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे. अनिलकुमार यादव (पती), सीताराम यादव (सासरे), संजय यादव (नणंद चा पती) अशा तिघांवर दाखल झालेला आहे. हे सर्व जण नालासोपारा पूर्व पेल्हार परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारील तावसाई या ठिकानाच्या बिल्डिंग न 25 मध्ये राहत होते. हे मूळचे उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत.
प्रितम आणि अनिलकुमार यांचा 29 मे 2019 रोजी उत्तर प्रदेशच्या वाराणसीत विवाह झाला होता. विवाह वेळी पती अनिलकुमार हा नोकरी करत असल्याने प्रितमच्या आईवडिलांनी त्याला लग्नात एक बोलेरो कार, 1 सोन्याची चैन, 4 सोन्याच्या अंगठ्या तसेच मुलीच्या अंगावर 4 लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेही घातले होते.
लग्नाच्या काही दिवसानंतर अनिलकुमार याने आपली नोकरी सोडून देऊन तो घरीच राहत होता. काहीच कामधंदा नसल्याने पुन्हा आई वडिलांकडून पैसे घेऊन ये, असे म्हणत पती, सासरे आणि नणंदेचा नवरा या तिघांनी प्रितम हिचा हुंड्यासाठी शारिरीक, मानसिक असा छळ करण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून गेले काही दिवस प्रीतम ही आपल्या आईवडिलांकडे राहायला गेली होती. पण 4 मार्चला ती पुन्हा सासरी आली होती.
अवघ्या तीनच दिवसात प्रितमला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात झाल्याने तिने अखेर सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असा आरोप मयत विवाहितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आत्महत्या केलेल्या मुलीचे वडील राम आवध यादव यांच्या तक्रारीवरून मंगळवारी पहाटेच्या सुमारास पेल्हार पोलीस ठाण्यात पती, सासरा, आणि नणंदेचा पती या तिघांवर 304 (ब), 306, आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी याबाबत माहिती दिली आहे. एकीकडे सर्व जग महिला दिन मोठ्या थाटामाटात साजरे करीत असताना आजही हुंड्यासाठी महिलांना आपला जीव गमवावा लागत असल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गाझियाबादमध्ये आर्थिक विवंचनेतून महिलेची मुलांसह आत्महत्या, वाचा नेमके काय घडले ?
लग्नानंतरही भेटण्यासाठी पाठलाग, विवाहितेनं आयुष्य संपवलं, नांदेडमधली धक्कादायक घटना