जितेंद्र पाटील, Tv9 मराठी, पालघर | 7 ऑक्टोबर 2023 : राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. राज्यात सातत्याने अशा घटना समोर येत आहेत. या घटना वाढू नयेत यासाठी सरकारकडून आरोपींवर अतिशय कठोर आणि वेगाने कारवाई केली जाणं अपेक्षित आहे, अशी भावना जनमानसात आहे. कारण तशा घटनाच सातत्याने समोर येत आहेत. आतादेखील पालघर येथून सुन्न करणारी एक घटना समोर आलीय. दोन आरोपींनी एका अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार केला. आरोपी अनेक महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत होते. ही पीडिता सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर संबंधित संतापजनक प्रकार उघडकीस आलाय.
अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पालघरच्या एका पोलीस ठाणे हद्दीत समोर आलीय. 14 वर्षाची दिव्यांग अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर, पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात 376 आणि पोक्सोसह इतर विविध कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अल्पवयीन मुलगी दिव्यांग असल्याचा फायदा घेऊन दोन्ही आरोपी पीडितेवर मागील अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होते, अशी खळबळजनक माहिती समोर आलीय. अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांनी एका आरोपीला शीताफिने अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित परिसरातून संताप व्यक्त होतोय.