Mumbai Crime News: दिल्लीत बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत 175 संशयित बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता मुंबई आणि ठाण्यात जोरदार कारवाई सुरु झाली आहे. कोणतीही कागदपत्रे नसताना महाराष्ट्रात राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहे. नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईच्या विविध भागात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरू आहे. गुन्हे शाखेकडून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. खारघर येथील कोपरा येथून चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक पुरुष व तीन महिला आहेत. खारघर पोलीस ठाण्यात बांगलादेशी नागरिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाशीच्या एपीएमसी परिसरात पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी एक पुरुष व पाच महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ठाणे जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मानपाडा आणि भिवंडी पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे २५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी कोणतीही अधिकृत कागदपत्रे आढळलेली नाहीत. मानपाडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. डोंबिवलीतील एका ठिकाणी सात बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी सापळा रचून या सात नागरिकांना ताब्यात घेतले. तसेच भिवंडी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १८ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या सर्वांवर विदेशी नागरिक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील आठवड्यात कल्याणमध्ये बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी विरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. उल्हासनगर गुन्हे शाखेकडून कल्याण टाटा कॉलनी परिसरात छापा टाकून दाम्पत्यास ताब्यात घेतले होते. ते 8 वर्षांपासून कल्याणमध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होते. ही महिला एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होती. अंजुरा कमल हसन आणि कमल हसन हरजद अली असे या दांपत्याचे नाव आहे.