ठाणे, 16 डिसेंबर | राज्यातील टॉप आयएएस अधिकारी अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजित आणि इस्टाग्रॉम इंफ्लुएंसर प्रिया सिंह यांच्यातील प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आहे. 26 वर्षीय प्रिया उमेंद्र सिंह ही एक व्यावसायिक ब्यूटीशियन आणि इस्टाग्रॉम इंफ्लुएंसर आहे. तिचे इस्टाग्रॉमवर लाखो फॉलोअर आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियाने अश्वजितवर अनेक आरोप केले आहेत. अश्वजित गायकवाड याने ओळवा येथील कोटियाड हॉटेल जवळ भेटायला बोलावले. त्या ठिकाणी प्रियाला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. तिच्या डाव्या हाताला देखील चावा घेतला. तिच्या अंगावर कार घातली, असा आरोप केला. प्रियाने आपल्या पोस्टमध्ये अश्वजितसह त्याचे मित्र रोमिल पाटील, प्रसाद पाटील, आणि सागर शेळके आणि चालक शिवा यांची नावे घेतली आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांना टॅग केले आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अश्वजित याची चौकशी केली.
अश्वजित याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, प्रिया सिंह माझी केवळ मित्र होती. मी परिवाराच्या कार्यक्रमामुळे हॉटेलमध्ये आला होतो. त्या ठिकाणी प्रिया पोहचली. तिने जबरदस्तीने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने मद्यपान केले असल्यामुळे मी नकार दिला. त्यानंतर ती गोंधळ घालू लागली. शिवीगाळ करु लागली. माझ्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने मारहाण सुरु केली. त्याचवेळी चालकाने गाडी सुरु केली. त्यावेळी प्रिया रस्त्यावर पडली. हा एक अपघात होता. प्रियाचा माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप अश्वजितने केला.
मुंबईत राहणारी प्रिया सिंह 26 वर्षीय इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर आहे. तिचे इस्टाग्रामवर लाखो फॉलोअर आहेत. तिचे अश्वजितशी प्रेमसंबंध असल्याचे म्हटले जात आहे. परंतु अश्वजित याचे लग्न झाले आहे. त्याने ते आपल्यापासून लपवून ठेवल्याचा प्रियाचा आरोप आहे. माझा घटस्फोट झाला असून तुझ्याशी मी लग्न करणार असल्याचे तो सांगत असल्याचे प्रियाकडून सांगण्यात आले.