उल्हासनगरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपण जिथे सकारात्मक ऊर्जा घेण्यासाठी जातो, चांगल्या कामाची सुरुवात करण्याआधी जिथे आशीर्वाद घेण्यासाठी जातो, ज्या देवाकडे नतमस्तक होतो, अशा देवळात दागिन्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरी करणारा हा बाहेरचा दुसरा तिसरा कुणी नसून मंदिराचा सुरक्षा रक्षकच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कुंपनानेच शेत खाल्लं असा प्रकार आता समोर येताना दिसत आहे. याप्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे. पण आरोपीने जे कृत्य केलं ते ऐकून नियमित देवळात येणाऱ्या भाविकांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
उल्हासनगरच्या कालीमाता मंदिरात संबंधित घटना घडली आहे. या मंदिरात तीन दिवसांपूर्वीच एक भामटा सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीसाठी रुजू झाला होता. पण त्याने संधी साधत त्याच्या साथीदाराच्या मदतीने मंदिरातील दागिन्यांची चोरी केली आहे. आरोपीने मंदिरातील देवीच्या अंगावरील 12 तोळे दागिन्यांची चोरी केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. संबंधित चोरीची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील कुर्ला कॅम्प परिसरात प्रसिद्ध कालीमाता मंदिर आहे. या मंदिरात तीन दिवसांपूर्वी रमेश थापा उर्फ रमेश रावल हा तरुण सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला लागला होता. दरम्यान आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास रमेशने आपल्या साथीदाराच्या मदतीने कालीमाता मंदिरातील देवीच्या अंगावर असलेले जवळपास 12 तोळे दागिने चोरून पळ काढला. या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, बदलापूरमध्ये देखील चोरीची घटना समोर आली आहे. बदलापूरमधील श्रीराम वडापाव सेंटर येथे अडीच लाखांची चोरी झालीय. बदलापूर पश्चिम मधील श्रीराम वडापाव सेंटरमध्ये रात्री पावणे तीनच्या सुमारास शटर उचकून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना तिथे लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अज्ञात चोरट्याने गल्ल्यात असलेले अडीच लाख रुपये रोकड लंपास केले असून या अज्ञात चोरट्या विरोधात बदलापूर पोलीस ठाणे पश्चिम येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बदलापूर पोलीस करत आहे.