मुंबई : सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyjatra) या विनोदी कार्यक्रमातील कलाकार पृथ्विक प्रतापसोबत (Prithvik Pratap) थरारक प्रसंग घडला आहे. शुटिंग आटोपून घरी जात असताना त्यांच्याोबत रिक्षावाल्यानं लुटण्याचा प्रयत्न केल्याचा थराराक अनुभव फेसबुकवरील पोस्टमधून (Facebook Post) खुद्द पृथ्विक यांनं शेअर केला आहे. मराठी कलाकार पृथ्वीक प्रताप याच्यासोबत घडलेला लुटीचा घडलेला प्रसंग सांगताना कोणत्या रिक्षात नेमकं हे सगळं घडलं, याचीही माहिती त्यानं दिली आहे. शूटिंग आटोपल्यानंतर घरी परतताना रिक्षावाला अरेरावी करून चुकीच्या रोडने घेऊन जात होता. मात्र पोलिसांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे आपण सुखरूप बचावले असल्याची फेसबुक पोस्ट पृथ्विकनं शेअर केली आहे.
पृथ्विक प्रताप काल शूटिंग संपवून काशीमीरा परिसरातून ठाण्याला जात होता त्यासाठी त्याने रिक्षा पकडली होती. मात्र रिक्षाचालक ठाण्याला जाण्याऐवजी वसईच्या दिशेने जाऊ लागला त्यानंतर दोघात शाब्दिक बाचाबाची झाली. पृथ्विकने पोलिसांना फोन करताच तो थांबला आणि भांडू लागला आणि पोलीस आल्याचे बघून पळून गेला. हा सर्व घटनाक्रम पृथ्वीक प्रताप याने फेसबूकवर सांगितलाय. अभिनेता पृथ्वीक प्रताप याने हिंदी फिल्म 83 मध्ये काम केलंय. शिवाय सध्या गाजत असलेल्या महाराष्ट्राची हास्यजत्रामधून तो घराघरांत पोहोचलाय.
दिनांक 21 जानेवारी रोजी रात्री 9च्या दरम्यान मी ग्रीन वॅली स्टुडिओज (काशिमीरा, मीरारोड) मधून शूटिंग आटपून घरी जाण्यास निघालो, नेमकी स्वतःची गाडी आज आणली नाही म्हणून ओला/उबेर बुक करण्याचा प्रयत्न करत होतो पण नेटवर्क वीक असल्यामुळे ते काही घडेना… शेवटी वैतागून चालत स्टुडिओ गेट मधून बाहेर पडलो आणि एका रिक्षा वाल्याला हात दाखवून विचारलं ‘ठाणे?’ त्यानेही तडक गाडी वळवली, मी बसलो, मीटर पडलं आणि आम्ही निघालो.
वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून त्याने गाडी कांदिवली दिशेला वळवली मी त्याला म्हणालो ‘थांब, आपल्याला ठाण्याला जायचंय गाडी घोडबंदर ने घे’ त्यावर त्याने ‘इधर से भी जाता है गाडी ठाणे को’ असं म्हणत त्याच्या मनाविरुद्ध रिक्षा fountain हॉटेल च्या दिशेने वळवली.
पण तो गाडी घोडबंदर च्या दिशेने नेण्याऐवजी वसई च्या दिशेने नेऊ लागला… मी पुन्हा त्याला म्हणालो ‘घोडबंदर मागे आहे, fountain च्या रस्त्याने जायचंय आपल्याला’ त्यावर तो चिडला आणि म्हणाला ‘मेरे को मत सिखा किधर क्या है, चुपचाप बैठ’ मी गाडी थांबव म्हणत असताना देखील तो वसई च्या दिशेने गाडी नेऊ लागला.
मी तडक ‘100’ नंबर वर फोन केला माझ्यासोबत घडणारा प्रकार पोलिसांना सांगितला, रिक्षाचा नंबर पोलिसांना सांगतोय हे कळताच त्या रिक्षावाल्याने रिक्षा पुन्हा fountain च्या दिशेने वळवली आणि म्हणाला ‘पोलीस को क्यू फोन कर रहे, गल्तीसे ये रस्ते पे गाडी डाला मैने’… आणि fountain हॉटेल जवळ त्याने गाडी थांबवली.
मी तडक गाडीतून उतरलो त्याचा फोटो काढला आणि त्याला म्हणालो कि ‘तेरा आयकार्ड, परमिट जो कूछ होगा दिखा’ त्यावर हुज्जत घालत तो म्हणाला ‘तू RTO वाला है क्या? तेरेको क्यू दिखाऊ, पोलीस को क्यू फोन लगाया? मेरी भी पुलिस में पहचान है, 20 साल से है इस धंदे में, बोहोत देखे है पुलिस वाले’ मी त्याला शांतपणे म्हणालो ‘थांब आता जे पोलीस येतील त्यांच्याशी पण ओळख करून घे म्हणजे नंतर काठी ची साईज किती हवी ते तू त्यांना सांगू शकशील’…. साधारण 10 मिनिटे हुज्जत घातल्यानंतर त्याने तिथे येणारे काही पोलीस पाहिले आणि त्याने तिथून धूम ठोकली…
मी पोलिसांना फोन केल्यानंतर अगदीच 15 ते 20 मिनिटांत माझ्या मदतीला 4 पोलिसवाले तिथे हजार होते…
या सगळ्याच श्रेय ‘सीनिअर PI वसंत लब्दे’ यांना जातं, त्यांनी तातडीने मदत पाठवली म्हणून मी सुखरूप घरी पोहोचलो.
हि पोस्ट लिहिण्याचं कारण इतकचं कि माझे कित्येक मित्र मैत्रीण मीरारोड मध्येच शूटिंग करतात, बऱ्याचदा त्यांचं शूटिंग संपायला मध्यरात्र उलटते त्यामुळे त्यांनी सुद्धा काळजी घ्यावी आणि महाराष्ट्र पोलिसांमुळे तितकाच निर्धास्त हि राहावं.
पोस्ट सोबत रिक्षा वाल्याचा नाव, गाडीचा नंबर आणि त्याचा फोटो जोडतोय. जेणेकरून कुठल्या रिक्षात आपल्याला बसायचं नाहीये हे सुद्धा कळेल.
नाव – राजेशकुमार हुबलाल यादव
रिक्षा नंबर – MH 02 EQ 0172
#ThankYouMumbaiPolice
आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांनी पृथ्विकची ही पोस्ट शेअर केली असून तो सुखरुप असल्याबाबत दिलासा व्यक्त केला आहे. दरम्यान, पृथ्विकसोबत घडलेल्या या प्रसंगानं मुंबईतील रिक्षावाल्यांच्या वागणुकीवरही अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
बँकेत केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक
ठाण्यात डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू, दीड महिन्यात चार बालकांचा मृत्यू