समोसे अनेकांचा आवडता खाद्यप्रकार आहे. स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध असणारे समोसे गरमागरम मिळण्यासाठी खवय्यांचे प्राधान्य असते. परंतु आता जर तुम्ही गरम समोसे खाण्याचे शौकीन असाल तर सावधान… असे म्हणण्याची वेळ आली आहे. एका ग्राहकाला गरम समोसे मागणे चांगलेच महागात पडले. दुकानदाराकडून गरम समोसे मागितल्यानंतर दुकानदाराचा संताप झाला. त्याने ग्राहकावर हल्ला करत त्याचे डोके फोडले. त्याला जखमी केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मुंबईतील मुंब्रा भागात हा प्रकार घडला.
मुंब्रामध्ये गरम समोसा मागणे एका ग्राहकाला चांगलेच महाग पडले. मुंब्रा येथील रहिवासी जियाउद्दीन शेख यांना गरमागरम समोसा खाण्याची इच्छा झाली. त्यांनी मुंब्रातील आनंद कोळीवाडा येथील माजिद शेख नामक दुकानदाराकडे आपला मोर्चा वळवला. त्याने समोश्याची मागणी करताच दुकानदाराने त्यांना समोसा दिला. परंतु समोसा थंड असलेला पाहताच जियाउद्दीन यांनी गरम समोसा देण्याची मागणी केली. त्यावर माजिद शेख यांनी खायचा असेल तर खा नाहीतर निघ, असे ठणकावले. यावर दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यामुळे जियाउद्दीन रागारागाने तिथून बाहेर पडला.
ग्राहक असलेला जियाउद्दीन निघून गेल्यावर दुकानदार माजीद शेख यांचा राग शांत झाला नाही. त्यांनी बाहेर जाणाऱ्या जियाउद्दीन यांच्यावर मागून जाऊन धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात जियाउद्दीन याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना ५ ते ६ टाके देखील पडले. त्यांचा कान देखील थोडा कापला गेला. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकरणाची तक्रार मुंब्रा पोलिसात करताच पोलिसांनी भादवी ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.