मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबई पुन्हा एकदा एका महिला अत्याचाराच्या घटनेने हादरली आहे. विशेष म्हणजे अवघ्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एका डिलिव्हरी बॉयने हे कृत्य केलं आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित घटनेप्रकरणी पीडितेच्या पालकांनी मुंबईच्या चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी डिलिव्हरी बॉयला बेड्या ठोकल्या आहेत.
आरोपी डिलिव्हरी बॉय हा डिलिव्हरी करण्यासाठी एका इमारतीजवळ गेला होता. तिथे एक 6 वर्षांची मुलगी एकटी उभी होती. डिलिव्हरी बॉयने तिला पत्ता विचारला. त्यानंतर तो मुलीला तिथे घेऊन गेला. तिथे त्याने पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला.
संबंधित घटेननंतर पीडितेने आपल्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर संतापलेल्या कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाण्यात जावून तक्रार केली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत डिलिव्हरी बॉयला अटक केली. या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास चारकोप पोलिसांकडून सुरु आहे.
देशात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील साताऱ्यात नुकतंच एक संताजनक घटना समोर आलीय. सातारा शहरातील एका उपनगरात एका 12 च्या वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील काकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी नराधम काका दिली होती. मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्याने ही बाब उघडकीस आली. याबाबत मुलीच्या पालकांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर 376 कलमान्वये पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर अत्याचार करणारा आरोपी फरार झाला आहे. याबाबत पोलीस सखोल तपास करीत असून फरार आरोपी काकाचाही कसून शोध घेत आहेत.
दुसरीकडे, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर विवाहिता मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी महिलेच्या चुलत दिरालाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मित्राच्या मदतीने वहिनीवर बलात्कार करुन दिराने ओढणीने गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. सोमवारी पहाटे हत्येचा प्रकार समोर आला.
मुंबईच्या साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना 10 सप्टेंबरला समोर आली. साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही धक्कादायक घटना 9 सप्टेंबरच्या रात्री घडली. आरोपीने बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं संतापजनक आणि अमानुष कृत्य केलं. या घटनेमुळे स्थानिकांकडून रोष व्यक्त करण्यात आला होता. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा :
घटस्फोटित पत्नीला मिठी मारुन बॉम्बने उडवलं, आत्मघाती हल्ल्यात नवऱ्याचाही मृत्यू
छपरींची एवढी हिम्मत की रस्त्यानं पोरी-बाळींना चालणं मुश्किल, संतापजनक व्हिडीओ व्हायरल