अविनाश माने, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, 29 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात विधान करणं चांगलंच भोवलं आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरल्याने दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. दळवी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दळवी यांना दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे गटाला चांगलाच झटका बसला असून एकच खळबळ उडाली आहे.
आज सकाळी 8 वाजता पोलिसांनी दत्ता दळवी यांना अटक केली. दळवी यांना त्यांच्या विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. दळवी यांना भांडूप येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दळवी यांना अटक झाल्याने ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. दळवी यांना अटक झाल्याची माहिती मिळताच भांडूप पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला जाणार आहे.
रविवारी भांडूपध्ये ठाकरे गटाने कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते. राजस्थानमधील प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे ‘हिंदुह्रदयसम्राट’ अशी उपमा लावण्यात आली होती. त्यामुळे दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली होती. दळवी यांचीही अर्वाच्य भाषा शिंदे गटाला चांगलीच झोंबली होती. त्यामुळे शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडूप पोलिस ठाण्यात दळवी यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. सार्वजनिक सभेत संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ आणि अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार दिली होती.
पालांडे यांच्या तक्रारीनंतर भांडूप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात भादंवि कलम 153 (अ),153 (ब),153(अ)(1)सी, 294, 504,505(1)(क) अन्वये गुन्हा दाखल केला होता. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणीचा दुसरा गुन्हा आहे. याची भांडूप पोलिसांनी गंभीर दखल घेत दत्ता दळवी यांना अटक केली आहे.
आज मिंधे गट आहे हे आपल्याला सगळ्यानां माहिती आहे. गद्दारीची कुऱ्हाड घेऊन मिंधे सरकार या ठिकाणी आरूढ झालेले आहे. पण मला वाटत आज कदाचित दिघे साहेब असते ना तर मी सांगतो या एकनाथ शिंदे ला चाबकाने फोडून काढलं असतं. एकनाथ शिंदे काय होता, एकनाथ बिंदे कुठे काय करत होता हे आम्ही स्वत: बघितलेले आहे. समजलं का? मी स्वत: बघितलेले आहे. परंतु बाळसाहेबांच्या जवळ आला, बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले. उद्धवजीच्या जवळ आले, त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि त्यांनी एवढी मोठी गद्दारी केली. स्वतः गद्दारी केली, पक्षाशी गद्दारी केली. नाव बाळासाहेबांचेच वापरायचे. हिंदुहृदयसम्राट वापरत आहेत. अरे XXXच्या तुला हिंदुहृदयसम्राटाचा अर्थ तरी माहिती आहे का?