मुंबई : बोरिवली येथील फ्लिपकार्ट कंपनीत पॅकिंग आणि डिलिव्हरीचे काम करणाऱ्या तिघांना मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपी आपल्या मैत्रिणींना खूश करण्यासाठी आणि महागड्या मोबाईलचा शौक पूर्ण करण्यासाठी रिटर्न ऑर्डर मुख्य कार्यालयात न पाठवून महागडे फोन आणि महागड्या वस्तू चोरायचे. कंपनीला ते स्कॅन करून परत आलेला माल मुख्य कार्यालयात पाठवला असे दाखवायचे.
एमएचबी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीत जास्त खरेदी आणि जास्त ऑर्डर्समुळे फ्लिपकार्ट कंपनीला याबाबत माहिती मिळाली नाही. चोरीच्या वाढत्या घटनांनंतर कंपनीला संशय आला आणि त्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यानंतर पोलिसांनी फ्लिपकार्ट कंपनीची फसवणूक करून महागडे मोबाईल आणि महागड्या वस्तू चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. प्रणय दीपक जावळ, भूषण संजय गांगण, सागर हितेंद्रभाई राजगोर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे तिघे फ्लिपकार्टमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचे. आरोपींनी 15 मोबाईल फोन आणि तीन स्मार्ट वॉच असे एकूण 3 लाख 31 हजार 272 रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल चोरला होता. या आरोपींना मालवणी, कांदिवली आणि गोराई परिसरातून अटक करण्यात आली आहे.
गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातून 11 मोबाईल जप्त करण्यात आले असून, कांदिवली, गोराई आणि दहिसर येथूनही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मैत्रिणींना बहुतांश महागडे मोबाईल देण्याचे काम चोरट्यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या टोळीला पकडण्यासाठी एमएचबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सूर्यकांत पवार, सपोनि भालचंद्र शिंदे, पोउनि अखिलेश बोंबले, पो.एच.जोपले, पो.एच.शिंदे, पो.एच.तावडे, पो.ना देवकर, पो.ना खोत, पो.ना आहेर, पो.शि सावी, पो.शि मोरे यांनी उत्तम काम केले आहे.