सुनील जाधव, Tv9 प्रतिनिधी, कल्याण | 4 मार्च 2024 : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रात्री दोन वाजेच्या सुमारास एका प्रवाशाला अडवून त्याला बेदम मारहाण आणि लुटणाऱ्या एका आरोपीला बेड्या ठोकण्यात कल्याणच्या महात्मा पोलिसांना मोठं यश आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात लुटमारीच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. रात्रीच्या वेळी चाकू दाखवून प्रवाशांना दमदाटी करुन लुटणाऱ्या घटनांची कल्याणमध्ये वारंवार चर्चा सुरु होती. अखेर अशाच एका प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरोपींवर अतिशय कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी. विशेष म्हणजे त्याच्या इतर सहकाऱ्यांनादेखील अटक करण्यात यावी आणि त्यांना पोलिसी खाक्या दाखवून वठवणीवर आणण्यात यावं, अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नाशिकवरून मुंबईला देवदर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीला कल्याण स्टेशन बाहेर तीन जणांनी मिळून बेदम मारहाण केली. आरोपींनी त्याच्या खिशातील मोबाईल आणि तीन हजार रुपये काढून घेतले. आरोपी प्रवाशाला लुटून पळून गेले. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अवघ्या पाच तासात एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल आणि लुटलेली रक्कम जप्त केली आहे. तर इतर दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालचंद्र मथुरे असं फर्यादीचं नाव आहे. तो नाशिकवरून मुंबईला देवदर्शनासाठी आला होता. तो देवदर्शन झाल्यानंतर आपल्या परतीच्या प्रवासासाठी भिवंडीतील कोनगाववरून रात्री दोन ते अडीचच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशनवर उतरला. त्या ठिकाणी आरोपी हर्षल कदम आणि त्याच्या दोन साथीदारांनी भालचंद्र मथुरेला स्टेशनच्या बाहेर अडवत त्याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. आरोपींनी त्याच्या खिशातील महागडा मोबाईल आणि तीन हजार रुपयेपर्यंतची कॅश घेऊन ते तिघे लंपास झाले.
मात्र याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात फिर्यादीने तक्रार दाखल करतात पोलीस ॲक्शन मोडवर आले. पोलिसांनी अवघ्या पाच तासांच्या आत या तिघांपैकी एकाला म्हणजेच हर्षलला गुप्त बातमीदारांच्या मदतीने बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. तर त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.