भिवंडी (ठाणे) : ठाणे जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भरदिवसा दुकानात शिरुन महिला दुकानातील सामान लंपास करत असल्याचं उघड झालं आहे. गेल्या आठवड्यात कल्याणच्या सूचक नाका परिसरात असलेल्या कपड्यांच्या दुकानात महिलांनी कपडे चोरी केल्याची घटना ताजी असताना आता भिवंडीत पुन्हा तशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पण यावेळी चोरी करणाऱ्या महिलांनी महाग वस्तूंची चोरी केली आहे. चोरी करणाऱ्या महिलांना एका ज्वेलर्सच्या दुकानात जावून सोने-चांदी खरेदीच्या बहाण्याने चोरी केली. दोघांनी बुरखा परिधान केलेला होता. त्यांनी व्यापाऱ्यांची नजर चुकवून तब्बल 42 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या लांबविल्या, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अशा चोरट्या महिलांना पोलिसांनी अटक करुन कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
भिवंडी शहरातील मुख्य बाजारपेठेत सरगम ज्वेलर्स आहे. या ठिकाणी 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी दोन बुरखाधारी महिला सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या. त्या दुकानातील कामगारांकडे वेगवेगळे दागिने पाहण्यासाठी मागत होत्या. यावेळी कामगारांची नजर चुकवून समोर ठेवलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या या महिलांनी स्वतः जवळ लपवून खरेदी न करताच निघून गेल्या. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. पण घटनेच्या दिवशी दुकान मालक आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही बाब लक्षात आली नाही.
दरम्यान, दुकान मालक कमलेश भवरलाल जैन यांना दोन दिवसांनंतर ही बाब नजरेत आली. त्यांनी निजामपूरा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात बुरखाधारी महिलांविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत सीसीटीव्हीच्या आधारे महिलांचा शोध सुरु केला आहे. पण महिलांनी बुरखा परिधान केलेला होता. त्यामुळे त्यांचा शोध घेणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
VIDEO : कल्याण पाठोपाठ आता भिवंडीत महिला चोरांचा सुळसुळाट, ज्वेलर्स मालकाची नजर चुकवत बांगड्या लांबविल्याhttps://t.co/ZZ6mi2vd5r#Crime #Theif #CCTV #Bhiwandi pic.twitter.com/iwURGIPTNu
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) October 27, 2021
दरम्याम, कल्याणमध्ये काही महिलांकडून चोरीची घटना नुकतीच समोर आली होती. या महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत या महिलांचा चेहरा देखील दिसत आहे. संबंधित घटना ही कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात घडली होती. सूचक नाका परिसरात एका कपड्याच्या दुकानात चोरीची घटना समोर आली होती. आरोपी महिलांनी दुकानात काम करणाऱ्या महिलांना बोलण्यात गुंतवत हजारो रुपयांचे कपडे चोरले. त्यानंतर त्या पसार झाल्या. महिलांच्या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. चोरी करणाऱ्यांमध्ये चार महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे.
महिलांनी फक्त कपड्यातील एकाच दुकानात नाही तर त्याच परिसरातील आणखी दोन दुकानांमध्ये अशाप्रकारे चोरी केल्याचं उघड झालं होतं. विशेष म्हणजे कपड्याच्या दुकानात चोरी करुन महिला पसार झाल्या. त्यानंतर दुकानात काम करणाऱ्या महिलांना आपल्या दुकानात माल कमी जाणवायला लागला. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्यात आला. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला प्रकार बघून दुकानमालक असलेल्या महिलेला धक्काच बसला. कारण आरोपी महिलांनी प्रचंड चपळपणे फसवणूक करत हजारो रुपयांचे कपडे चोरी केले होते.
हेही वाचा :
बाजारातून परतलेल्या आईसमोर भयावह दृश्यं, तीन लेकरं पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत