मुंबई : बोरिवलीत संजय गांधी नॅशनल पार्कसमोर गोळीबाराची घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही आज (29 सप्टेंबर) संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास घडली. गोळीबार करणारे आरोपी हे दुचाकीने आले होते. त्यांच्याजवळ काळ्या रंगाची दुचाकी होती. त्या दुचाकीची पेट्रोलची टाकी ही लाल रंगाची होती. त्यांनी नॅशनल पार्कबाहेर एका कारवर गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. काही नागरिकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत आरोपी हे फरार झाले होते.
बोरिवलीत संजय गांधी नॅशनल पार्कबाहेर संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान एका पांढऱ्या रंगाच्या कारवर दोन अज्ञात आरोपींकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबार करणारे हे आरोपी हे दुचाकीवरुन आले होते. त्यांनी पांढऱ्या रंगाचा रेनकोर्ट घातलेला होता. आरोपी गोळीबार करुन फरार झाले. पण या गोळीबारात कुणीही जखमी झाले नसल्याची बातमी समोर आली आहे. ज्या गाडीवर गोळीबार झाला ती गाडी मीरा भाईंदर येथील बांधकाम विभागाच्या एका कार्यकारी अभियंत्याची आहे. त्याचं दीपक खाम्बित असं नाव आहे. दीपक खाम्बित हे सुखरुप आहेत. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी केलेल्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. दीपक यांच्या कारवर 2 राउंड फायरिंग केली गेली आहे. पण पोलिसांना आतापर्यंत एकच गोळी मिळाली आहे. दुसऱ्या गोळीचा शोध अद्यापही सुरुच आहे. ज्यावेळी दीपक यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी ते मीरा भाईंदर महापालिकेतून आपल्या बोरिवली येथील घरी कारने जात होते.
दीपक यांच्या गाडीने नॅशनल पार्कच्या ब्रिजच्या खालून घरी जाण्यासाठी युटर्न घेतला त्याचवेळी ब्रिजखाली बसलेल्या दोन अज्ञात आरोपींनी कारवर गोळीबार केला. पण सुदैवाने दीपक बचावले. ते सुखरुप आहेत. आरोपींनी पांढऱ्या रंगाचा रेनकोर्ट घातलेला होता. त्यामुळे त्यांचा चेहरा दिसला नाही. तसेच दीपक यांची गाडी त्यावेळी ड्रायव्हर चालवत होता.
बोरिवलीत ज्या भागात ही गोळीबाराची घटना घडली त्या परिसरात साधारणत: टूर अँड ट्रॅव्हल्सचे कार्यालये सर्वाधिक आहेत. घटनास्थळावर या घटनेचे साक्षीदार असलेल्या काही लोकांच्या माहितीनुसार ही घटना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली, असा त्यांचा अंदाज आहे. ते आपलं काम करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज आला. ते आपलं काम सोडून रस्त्यावर बाहेर आले तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. पण कारचा काच फुटलेला होता. गाडीत त्यावेळी ड्रायव्हर आणि त्या गाडीचा मालक असे दोनच माणसं होती, अशी देखील माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असंही त्यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे संबंधित घटना ज्या ठिकाणी घडली त्या घटनास्थळापासून काही अंतरावरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचं घर आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भर दिवसा अशाप्रकारे गोळीबार होत असतील तर मुंबईकरांनी काय करावं? या गोळीबारात कुणा निष्पाप नागरिकाचा बळी गेला तर? असे प्रश्न स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहेत.
दरम्यान, या घटनेवर प्रविण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही गेल्या काही दिवसांपासून ओरडतोय, या राज्यातील कायदा-सुव्यवस्था संपलेली आहे. जर आरोपी खुलेआम येऊन गोळ्या झाडत असतील तर त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. रोज गोळीबार, हत्येच्या घटना घडत आहेत. आम्ही जे बोलतो ते राजकीयदृष्टीने पाहिले जातं. त्यानंतर एकमेकांना काउंटर करण्याचं काम सुरु आहे. महाराष्ट्रात पूर्णपणे कायदा-सुव्यवस्था हाताबाहेर गेली आहे. साकीनाकाची घटना झाली. मुंबईची बदनामी झाली. असुरक्षित मुंबई ही पुन्हा एकदा समोर आली. अशाप्रकारची फायरिंग होत असेल तर मुंबईकरांनी जीव मुठीत धरुन जगायचं का? गृह विभागाने आतातरी गांभीर्याने विचार करायला हवा. मुंबईकरांची एकेकाळी आदरयुक्त भीती होती. पण आता कायद्याची कुणालाच भीती राहिलेली नाही. ते अत्यंत गंभीर आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले.
हेही वाचा :
अनैतिक संबंधांचा संशय, 50-60 जणांच्या टोळक्याने महिला आणि तरुणाला निर्वस्त्र करत गावात फिरवलं