मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तीन आरोपींचा जामीन अर्ज किल्ला कोर्टानं फेटाळून लावला आहे. त्यामुळे आर्यन खानला काही दिवस मुंबईतील आर्थर रोड कारागृहात काढावे लागणार आहेत. आज दुपारीच आर्यन खानची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे दहशतवादी अजमल कसाबला ज्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं, त्याच कारागृहात आर्यन खानची रवानगी करण्यात आली आहे. (Aryan Khan sent to Arthur Road Jail, How is the Arthur Road Jail?)
मुंबई सेंट्रल जेललाच आर्थर रोड कारागृह असं संबोधलं जातं. 1926 मध्ये इंग्रजांच्या काळात या कारागृहाची निर्मिती करण्यात आली होती. मुंबईतील सर्वात मोठं आणि सर्वात जुनं कारागृह अशी या कारागृहाची ओळख आहे. शहरातील अधिकाधिक कैद्यांना याच कारागृहात ठेवलं जातं. हे कारागृहह जवळपास 2 एकर जागेवर उभारण्यात आलेलं आहे. या कारागृहात कैद्यांची मोठी गर्दी असते. वास्तवात फक्त 800 कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, इथे सध्या 2 हजाराहून अधिक कैदी ठेवले जातात. जुलै 2021 मध्ये कारागृहात 8 नवीन बॅरेक्स तयार करण्यात आले आहेत. त्यात अतिरिक्त 200 कैद्यांना ठेवण्यात येत आहे.
या कारागृहात दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी हे कारागृह चांगलंच चर्चेत आलं होतं. त्याचबरोबर अबू सालेमसह अंडरवर्ल्डशी संबंधित अनेकांना अनेकांना याच कारागृहात शिक्षा भोगावी लागली आहे. इतकंच नाही तर शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा झालेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्तलाही या कारागृहात ठेवण्यात आलं होतं.
2006 मध्ये आर्थर रोड कारागृहात दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनच्या टोळीतील आरोपींमध्ये मोठा संघर्ष झाला होता. त्यानंतर दोन विरोधी गटातील आरोपींना कारागृहाच्या वेगवेगळ्या भागात ठेवण्यात येत आहे. 2010 मध्येही अबू सालेम आणि मुस्तफा डोसा यांच्यात मोठी हाणामारी झाली होती. त्यावेळी अबू सालेमच्या चेहऱ्यावर चमचाने हल्ला करण्यात आला होता. हे दोघेही 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आहे.
दरम्यान, आर्यन खानसह मुंबई ड्रग्स प्रकरणातील 5 आरोपींना आर्थर रोड कारागृहातील बॅरेक क्रमांक 1 मध्ये ठेवलं जाणार आहे. कारागृहाच्या पहिल्या मजल्यावर हे बॅरेक आहे. सर्व आरोपींना कारागृहाचा गणवेश दिला जाणार आहे. काही लक्षणं आढळल्यास त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसंच इतर कैद्यांप्रमाणेच त्यांना वागणूक दिली जाणार आहे. सर्व आरोपींना तुरुंगाबाहेरचं अन्न घेता येणार नाही. या आरोपींना 5 दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.
इतर बातम्या :
Aryan Khan sent to Arthur Road Jail, How is the Arthur Road Jail?