मुंबईत गुन्हेगारांनी डोके वर काढले आहेत. गेल्या काही दिवसांत महामुंबईत गोळीबाराच्या पाच घटना घडल्या आहेत. शनिवारी बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार ही पाचवी घटना आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची हत्या झाल्याची ही दुसरी घटना ऑक्टोंबर महिन्यातच घडली. मुंबईतील वाढत्या गोळीबाराच्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंता निर्माण होत आहे. या घटना एखाद्या बॉलीवूडमधील चित्रपटाप्रमाणे घडल्या आहेत. भर रस्त्यात आरोपी गोळीबार करुन पसार होत आहेत.
मुंबई पोलिसांनी १९९० च्या दशकात दाऊद इब्राहिमसारख्या गुंडांचे गँगवार संपवले. आता मुंबईत सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहता पुन्हा या गुन्हेगारांना ठेचून काढण्याची कामगिरी मुंबई पोलिसांना बजवावी लागणार आहे.
- फेब्रुवारी महिन्यातच पश्चिम मुंबईतील दहिसर परिसरात गोळीबार झाला होता. शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नावाच्या इसमाने गोळ्या झाडल्या होत्या. आता न्यायालयाच्या आदेशानंतर या हत्येचा तपास सीबीआय करत आहेत.
- फेब्रुवारी महिन्यात उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यातच गोळीबाराचा प्रकार घडला होता. भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार केला होता. शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी गोळीबार केला होता.
- एप्रिल महिन्यात अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. या गोळीबार प्रकरणातही बिश्नोई गँगचा हात होता.
- सप्टेंबर महिन्यात बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांवर गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला होता. अक्षय शिंदे याने तीन राऊंड फायर केले होते.
- आक्टोंबर महिन्यातच मुंबईतील भायखळामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सचिन कर्मी यांची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. त्यानंतर १२ ऑक्टोंबर रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली.