मुंबई : मायानगरी मुंबई देशातील इतर शहरांच्या तुलनेत महिलांसाठी सुरक्षित समजली जाते. पण आता कदाचित ही ओळख पुसत चालली आहे. महिलांविरोधात घडणारे गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले. पण महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. उलट वाढत चाललीय. मुंबईत महिलांना लक्ष्य करुन होणारे गुन्हे लक्षात घेता, परिस्थिती चिंताजनक आहे. मागच्या आठवड्यात दिवसाढवळ्या मुंबई लोकलमध्ये परिक्षेसाठी चालेल्या एका तरुणीवर जबरदस्तीचा प्रयत्न झाला.
त्यानंतर गोवंडी येथील एका खासगी रुग्णालयात बोगस डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केला. आता घडलेली तिसरी घटना त्यापेक्षा भयानक आहे.
साकीनाका भागात धक्कादायक घटना
मुंबईत धावत्या ऑटोरिक्षामध्ये प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरुन हत्या केली. सोमवारी साकीनाका भागात ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने त्यानंतर स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. तो घटनास्थळावरुन नंतर पसार झाला, असं पोलिसांनी सांगितलं.
आरोपीने काय केलं?
मुंबईत साकीनाका येथे खैरानी रोड दत्तनगर येथे धावत्या ऑटिरिक्षामध्ये ही धक्कादायक घटना घडली. रिक्षामध्येच या जोडप्यात भांडण झालं. आरोपीने तिथेच त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने महिलेचा गळा चिरला व तिथून पसार झाला.
ती रिक्षातून बाहेर पडली, पण….
“दीपक बोरसेने धावत्या रिक्षामध्ये पांचशिला जामदार या तरुणीचा गळा चिरला. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ती रिक्षातून बाहेर पडली. पण काही अंतरावर जाऊन पडली. बोरसेने गळा कापून स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला” असं अधिकाऱ्याने सांगितलं.
नेमकं काय घडलं?
“रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचाऱ्यांनी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. दोघांना रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर महिलेला मृत घोषित केलं. आरोपीवर उपचार सुरु आहेत” असं पोलिसांनी सांगितलं. महिला आणि आरोपी दोघे परस्परांना ओळखत होते. रिक्षात बसल्यानंतर सुरु झालेल्या वादावादीतून आरोपीने हे भयानक कृत्य केलं. पोलिसांनी आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.