मुंबई : हल्ली चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः सोसायट्यांमध्ये घुसून चोरी करण्याचे प्रमाण मोठे आहे. अशीच एक घटना कांदिवलीत घडली होती. घरातील ऐवज लुटल्यानंतर चोरटे फरार झाले होते. मात्र पोलिसांनी अथक प्रयत्न करुन या ‘स्पायडर मॅन’ नावाच्या चोरांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी अंधेरीपासून कांदिवलीपर्यंत सक्रिय होती. या चोरट्यांनी आतापर्यंत चोरीचे अनेक गुन्हे केले आहेत. चेतन प्रकाश राठोड, दीप प्रकाश पांचाळ आणि अंबिका शंकर राठोड अशी तिन्ही आरोपींची नावे असून, त्यांना अंधेरी येथून अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी अंधेरीचे रहिवासी आहेत. आरोपींवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
कांदिवली पूर्वेतील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयकॉन सोसायटीत 17 जून रोजी रात्री या टोळीने चोरी केली होती. चोरट्यांनी सोन्याची चैन, कानातले, सोन्याच्या अंगठ्या आणि एक हिऱ्याची अंगठी चोरुन नेली होती. या सर्व ऐवजाची किंमत सुमारे 1 लाख 85 हजार रुपये आहे. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात पीडितांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर समतानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल भगत आणि सहायक पोलीस निरीक्षक संदिपान उबाळे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. सूत्रांची माहिती आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने समता नगर पोलिसांनी अंधेरी येथून 1 महिला आणि 2 पुरुषांना अटक केली. तिन्ही आरोपींकडून 25 ग्रॅम सोन्याची रॉड, सोन्याची चैन आणि हिऱ्याची अंगठी जप्त करण्यात आली आहे.