मुंबई : रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अखेर आरे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इंद्रजित सिंग असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी 6 जुलै रोजी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली. आरे पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 376, 354 बी, 509, 323, 506 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. ही घटना 17 मे रोजी घडली होती. मात्र मारहाण आणि धमकीमुळे घाबरेलल्या महिलेने याबाबत कुणालाही सांगितले नाही. मात्र मारहाणीमुळे महिलेला सतत त्रास होत होता. यामुळे कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने सर्व प्रकार सांगितला.
पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी महिला नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथून गोरेगावला परतत होती. गोरेगाव येथील आरेच्या जंगलात रिक्षा येताच सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास रस्ता निर्मनुष्य असल्याची संधी साधली. रिक्षा चालकाने लघुशंकेच्या बहाण्याने रिक्षा थांबवली. यानंतर रिक्षातच महिलेचा विनयभंग केला. महिलेने विरोध करताच आरोपीने तिला मारहाण केली. तसेच याबाबत कुणाला सांगितल्यास महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे महिलेने याबाबत घरच्यांना काहीच सांगितले नाही.
पीडितेची दोन महिन्यांपूर्वी डिलीवरी झाली होती. मारहाणीमुळे तिचे टाके तुटले होते आणि तिला सतत रक्तस्त्राव होत होता. यामुळे कुटुंबीयांनी महिलेकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी 6 तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पीडितेच्या जबाबवरुन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.