मुंबई : गोरेगाव परिसरात हैराण करणारी घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाचे काही अज्ञात लोकांनी अपहरण केले. तरुणाच्या घरच्यांकडे 5 लाखाची मागणी केली. यानंतर घाबरेल्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेत मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि सदर ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. त्या आधारे पोलिसांनी तरुणाचा माग काढला आणि त्याची सुटका केली. पण तपासात जे उघड झाले ते ऐकून कुटुंबीयांसह पोलिसांनाही धक्का बसला. अपहृत तरुणाने स्वतःच स्वतःच्या अपहरणाचा डाव रचला होता. वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी सदर तरुणावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
जितेंद्र जोशी असे आरोपी तरुणाचे नाव असून, तो दहिसर पूर्व घरटनपाडा येथील रहिवासी आहे. जितेंद्रने अनेक ठिकाणांहून कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याच्यावर दबाव होता. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्या अपहरणाचा कट रचला. त्यानुसार 31 मे रोजी रात्री 11:30 वाजता डी मार्टमधून बाहेर पडल्यानंतर आरोपीने त्याचा मोबाईल बंद केला. पती उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून पत्नीने त्याला अनेक वेळा कॉल केला. पण त्याचा फोन बंद होता.
यानंतर रात्री 2 वाजता आरोपीच्या पत्नीच्या मोबाईलवर हात-पाय बांधलेला व्हिडीओ आला. काही वेळाने तिला त्याच नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल करून 5 लाख रुपयांची मागणी केली. तसेच याबाबत कोणालाही सांगितल्यास मारुन टाकण्याची धमकी दिली. यानंतर घरच्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपी स्वत: दुचाकी चालवून एका व्यक्तीला सोबत घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बांगुनगर पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या मदतीने आरोपीला मालाड परिसरातून अटक केली.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध दिशाभूल केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीने अनेक ठिकाणांहून कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी वडिलांकडून पैसे मिळवण्यासाठी त्याने अपहरणाचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.