तू काळी, तुझे ओठ काळे… सासूच नव्हे ज्याला सर्वस्व अर्पण केलं त्याचेही टोमणे, अखेर सूनेने नको ते केलं; धक्कादायक घटनेने डोंबिवली हादरली

| Updated on: Jul 10, 2024 | 3:00 PM

घर घेण्यासाठी 10 लाखांचा हुंडा मागणं, तसेच शारिरिक आणि मानसिक छळ करणे, याप्रकरणी पती सागर बारी आणि सासू शोभा बारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

तू काळी, तुझे ओठ काळे... सासूच नव्हे ज्याला सर्वस्व अर्पण केलं त्याचेही टोमणे, अखेर सूनेने नको ते केलं; धक्कादायक घटनेने डोंबिवली हादरली
Follow us on

Dombivli Police Constable Wife Killed herself : “तुझे काळे ओठ आहेत, तुझ्या तोंडाचा घाण वास येतो”, अशा टोमण्यांना वैतागलेल्या एका महिलने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सासू आणि नवऱ्याच्या जाचाला कंटाळून त्या महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे. जागृती बारी (24) असे या महिलेचे नाव आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय?

भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील गजानन भिका वराडे यांनी आपली मुलगी जागृतीचा विवाह जळगावमधील पिंप्राळामधील सागर रामलाल बारी याच्यासोबत केला होता. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी 20 एप्रिल 2024 रोजी जागृती आणि सागर यांचे धुमधडाक्यात लग्न झालं होतं. यावेळी जागृतीच्या आई-वडिलांनी सागरला 14 ग्रॅमची सोन्याची चेन, 6 ग्रॅमची सोन्याची अंगठी दिली होती. सागर हा मुंबई पोलीस असल्याने तो विवाहानंतर 21 जूनला कल्याणमध्ये राहण्यासाठी घेऊन जाणार होता. त्यापूर्वी त्याचे आई-वडील लेक जागृतीला भेटायला गेले होते. ज्यावेळी जागृतीचे आई-वडील भेटायला गेले, तेव्हा तिची सासू शोभा रामलाल बारी हिने हुंडा दिला नाही, अशी तक्रार केली. त्यासोबतच मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाख रुपये द्या, अशी मागणीही वराडे कुटुंबाकडे केली.

मात्र वराडे कुटुंबियांनी शेतीमध्ये पैसा लागलेला आहे, त्यामुळे पैसे नाहीत. मी तुम्हाला थोडीफार रक्कम देईन, असं सांगितलं. यानंतर जागृतीही मुंबईत राहायला गेली. यानंतर 5 जुलैला जागृतीचा पती सागरने तिचा भाऊ विशालला फोन केला आणि त्याने तुझ्या बहिणीने घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतला, असे सांगितलं. त्यानंतर फोन कट केला. या फोननंतर तिचे वडील, आई आणि काही नातेवाईक कल्याणमध्ये आले. यानंतर जागृतीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घर घेण्यासाठी 10 लाखांचा हुंडा मागणं, तसेच शारिरिक आणि मानसिक छळ करणे, याप्रकरणी पती सागर बारी आणि सासू शोभा बारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

यावेळी जागृतीच्या आईने पोलिसांनी तिच्यासोबत शेवटचं काय बोलणं झालं या याबद्दलही सांगितलं. ‘आई माझी सासू मला तू काळी आहेस, तुझे ओठ काळे आहेत, तोंडाचा घाण वास येतो असे सारखी हिणवत असते. तसेच तू माझ्या मुलाला पसंत नाही. घरातून निघून जा. नाहीतर आईकडून घर घेण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन ये. माझा शारिरिक आणि मानसिक छळ करते, तू त्यांच्याशी बोलून घे’, असे जागृतीने तिच्या आईला सांगितले होते.

पंख्याला गळफास घेत आत्महत्या

जागृतीला सासू आणि नवऱ्याच्या सततच्या टोमण्यांनी कंटाळा आला होता. त्यामुळे 5 जुलैला सासू गहू घेण्यासाठी बाहेर गेली असता बाहेरून घराला कुलूप लावलं. यानंतर जागृतीने पाण्याच्या ड्रमची मदत घेत, पंख्याला ओढणी बांधत गळफास घेतला.

सुसाईड नोट सापडली

जागृतीचा पती मुंबई पोलिसात कार्यरत आहे. तर सागर आईसोबत कल्याणमधील आडीवली ढोकळी भागात एकविरा आई अपार्टमेंटमध्ये राहत होता. डोंबिवलीमध्ये आल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्येच जागृतीने टोकाचं पाऊल उचललं, त्याआधी तिने मोबाईलमध्ये सुसाईड नोटही लिहिली होती. मोबाईल लॉक असल्यामुळे सागरला तो लॉक ओपन करता आला नाही. यानंतर पोलिसांनी जागृतीचा मोबाईल ताब्यात घेतला.

जागृतीच्या बहिणीने लॉक पॅटर्न सांगितल्यानंतर पोलिसांना ती सुसाईड नोट सापडली. ज्यात जागृतीने आत्महत्येला सासू आणि नवऱ्याला जबाबदार धरलं आहे. या आधारे मानपाडा पोलिसांनी जागृतीचा नवरा आणि सासूवर गुन्हा दाखल केला आहे.