चोरट्यांची कमाल, चक्क सहा हजार किलोचा पूलच चोरला, मग कसे सापडले जाळ्यात

| Updated on: Jul 08, 2023 | 4:05 PM

Crime News : चोरी कसली होईल, हे आता सांगता येत नाही. चोरट्यांनी चक्क पुलाची चोरी केली आहे. तब्बल सहा हजार किलो वजन असलेल्या पुलाची चोरी झाली आहे. ही चोरी झाली तरी कशी? हा विचार पोलीससुद्धा करु लागले होते...

चोरट्यांची कमाल, चक्क सहा हजार किलोचा पूलच चोरला, मग कसे सापडले जाळ्यात
Iron Bridge
Follow us on

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे यांचा भ्रष्टाचारासंदर्भातील एक चित्रपट आला होता. ‘जाऊ तिथे खाऊ’ हा चित्रपट त्या काळात प्रचंड गाजला होता. या चित्रपटात विहिरीची चोरी झाल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु ही चोरी भ्रष्टाचारामुळे झाल्याचे होते. थोडक्यात भ्रष्टाचारावर मार्मिक टोला त्यामाध्यमातून लगावला होता. विहिरीची चोरी होत नाही पण पुलाची चोरी होऊ शकते. चोरट्यांनी एका पुलाची चोरी केली आहे, असे म्हटले तर तुम्हाला खरं वाटणार नाही. पण चोरट्यांनी तब्बल सहा हजार किलो वजन असलेल्या पूल चोरून नेला आहे. या प्रकारामुळे पोलीस हैरान झाले.

कुठे घडली घटना

मुंबईत पुलाच्या चोरीची घटना घडली आहे. या ठिकाणी ६० क्विंटल म्हणजे सहा हजार किलोच्या पुलाची चोरी झाली आहे. लोखंडाचा असलेला हा पूल चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरानंतर पोलीससुद्धा हैरान झाले आहेत. मुंबईतील मलाड (पश्चिम) मध्ये नाल्यावर असलेला हा पूल चोरला गेला आहे. हा पूल अदाणी इलेक्ट्रीसिटीने विजेच्या तारांचे स्थलांतर करण्यासाठी बनवला होता. मग या नाल्यावर कायमस्वरुपी पूल उभारण्यात आला. त्यानंतर हा लोखंडी पूल दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आला.

अन् पुलाची झाली चोरी

सहा हजार किलो वजन असलेला पूल दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आला. त्यानंतर २६ जून रोजी पूलच नसल्याचे समोर आले. यानंतर अदाणी कंपनीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरु केला. त्यावेळी ६ जून रोजी पूल जागेवर असल्याचे दिसून आले. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. यामुळे पोलिसांनी जवळपास असणाऱ्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

असा लागला शोध

पोलिसांना सीसीटीव्ही फूटेजमधून ज्या वाहनातून पूल घेऊन जात होते, त्यात गॅस कटर दिसले. या गॅस कटरच्या साह्याने पूल कापला गेला होता. वाहनाच्या क्रमांकावरुन पोलिस तपास करु लागले. तेव्हा ज्या फर्ममध्ये पूल बनवला गेला होता, त्याठिकाणी पोलीस पोहचले. तेथील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मग पोलिसांनी त्या फर्ममधील कर्मचारी आणि त्याच्या अन्य तीन साथादारास अटक केली. पोलिसांना पूलसुद्धा मिळाला आहे.