मुंबई: अलीकडे सेक्सटॉर्शनचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. यात ब्लॅकमेलिंग (Blackmailing) करुन पैसे उकळले जातात. मुंबईतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला याचा धक्कादायक अनुभव आला. या व्यक्तीची सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून लूट करण्यात आली. त्याच्याकडून तब्बल 2.06 लाख रुपये उकळण्यात आले. समोरुन फोन करणाऱ्या व्यक्तीने दिल्ली सायबर क्राइम सेलमधील (Delhi cyber crime cell) अधिकारी असल्याचं सांगितलं. अटक टाळण्यासाठी म्हणून पीडित व्यक्तीने ही रक्कम दिली. त्याचे न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देण्यात येत होती. वांद्रे पोलिसांनी (Bandra police) अज्ज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. फोन करणाऱ्याने विक्रम राठोड अशी स्वत:ची ओळख सांगितली होती. दिल्ली पोलीस दलात काम करत असल्याचा त्याने दावा केला होता. 2.06 लाख उकळल्यानंतर राठोड सतत धमकी देत होता व जास्त पैशांची मागणी करत होता.
वांद्रे पश्चिमेला रहाणाऱ्या एका 57 वर्षीय व्यक्तीला 11 जून रोजी व्हॉट्स एपवर मेसेज आला. व्हिडिओ सेक्स मध्ये इंटरेस्ट आहे का? अशी विचारणा केली होती. त्यावर त्याने येस असा रिप्लाय केला. त्यानंतर त्याच्या मोबाइलवर फोन आला. समोरुन बोलणाऱ्या महिलेने त्या व्यक्तीला विवस्त्र होण्यास सांगितलं. तो लगेच तयार झाला. त्यानंतर त्याला धमकीचे फोन येण्यास सुरुवात झाली. त्याच्या बहिणीला, कुटुंबियांना या न्यूड व्हिडिओबद्दल सांगू, अशी धमकी त्याला देण्यात आली.
व्हिडिओ कॉल करणारी महिला सुद्धा विवस्त्र होती. पण तिने तिचा चेहरा दाखवला नाही, असं पीडित तक्रारदाराने सांगितलं. हे सर्व सुरु असताना अचानक कॉल कट झाला व त्याला दुसरा कॉल आला. त्यात महिलेने त्याला धमकावले. तुझा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला असून 81 हजार रुपये दिले नाही, तर सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी दिली. पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
दोन दिवसानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने दिल्ली सायबर क्राइम विभागात काम करत असून प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. अटक टाळून व्हिडिओ डिलिट करायचे असतील, तर रणवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीला संपर्क करण्यास सांगितलं. त्याने गुप्ताला फोन केला त्याने 51 हजार रुपयांची मागणी केली. आरोपींकडून सतत पैशांची मागणी होत असल्याने अखेर त्याने पोलीसात धाव घेऊन तक्रार नोंदवली.