नागपूर : कानात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. कानात हेडफोन असल्याने ट्रेनचा आवाज तरुणीला ऐकू आला नाही. यामुळे तरुणी रेल्वेखाली चिरडली गेल्याची घटना नागपूरमध्ये घडली. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. आरती मदन गुरव असे मयत तरुणीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पथकासह दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मयत विद्यार्थिनी आरती गुरव ही मूळची भंडारा जिल्ह्यातील सातोना या गावची निवासी आहे. हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथे मावशीकडे ती वास्तव्याला होती. आरती गुरव डोंगरगाव जवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती.
आज सकाळी टाकळघाटवरून गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ एसटीने आली. यानंतर पायदळ रेल्वे स्थानकावर रेल्वे फाटक ओलांडून जात होती. यावेळी आरती मोबाईलवर हेडफोन लावून बोलत चालली होती.
याचदरम्यान त्या ट्रॅकवर भरधाव वेगात ट्रेन येत होती. आजूबाजूच्या लोकांनी तिला मोठमोठ्याने आवाज दिला. मात्र हेडफोन कानात असल्याने तिला कुठलाही आवाज आला नाही.
भरधाव आलेल्या पुणे-नागपूर रेल्वेखाली चिरडून तिचा मृत्यू झाला. इतकेच नाही रेल्वेने तिला 50 फूट पर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. हिंगणा पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली.