नागपूर / 3 ऑगस्ट 2023 : नागपुरच्या सिताबर्डी पोलीस ठाण्याच बॉम्ब असल्याचा निनावी फोन आला आणि एकच खळबळ उडाली. या फोननंतर पोलिसांची एकच धावपळ उडाली. बुधवारी पहाटे 112 क्रमांकावर फोन करुन सिताबर्डी पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली. तात्काळ पोलीस ठाणे रिकामे करण्यात आले. मात्र तपासानंतर कुणीतरी खोडसाळपणे हा फोन केल्याचे उघड झाले. याप्रकरणी सिताबर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे.
बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास 112 क्रमांकावर फोन आला. फोन करणाऱ्याने व्यक्तीने सिताबर्डी पोलीस ठाण्यात बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगत फोन कट केला. यानंतर तात्काळ सिताबर्डी पोलीस ठाण्यातील ड्युटीवरील अधिकाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. तात्काळ पोलीस ठाणे रिकामे करण्यात आले. सर्व पोलीस कर्मचारी आणि आरोपींना बाहेर काढण्यात आले.
यानंतर बीडीएस पथकाला पाचारण करण्यात आले. बॉम्ब शोधक पथकाने सर्व परिसराची पाहणी केली, मात्र कुठेही काहीही सापडले नाही. यामुळे कुणीतरी फोन करुन खोडसाळपणा केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल बेडवाल यांनी सिताबर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. ज्या नंबरवरुन फोन आला, तो नंबरही ट्रेस करण्यात येत आहे.