नागपूर : युट्यूब व्हिडीओमधील टास्क पूर्ण करण्याच्या नादात नागपुरातील 12 वर्षीय मुलाला गळफास लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अग्रण्य बारापत्रे असं या मुलांचं नाव आहे. त्याच्या मृत्युमुळं मोबाईलवर गेम किंवा व्हिडीओ पाहणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी सक्करदरा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोबाईलचे वेड मुलांच्या जीवावर बेतत आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मयत मुलगा हा केंद्रीय विद्यालयात आठव्या वर्षात शिकत होता. तो आई वडिलांसह क्वार्टर भागात राहत होता. वडील सचिन कामानिमित्त बाहेर गेले होते. आई घरकाम करत असताना मुलगा समोरच्या घरी पतंग उडवायला गेला.
मुलाला युट्यूब पाहण्याचे वेड होते. तो कायम युट्युबवरील व्हिडिओ बघायचा आणि डाउनलोड करायचा. विशेषतः चॅलेंज स्वीकारणारे व्हिडिओ बघून तो तसं प्रत्यक्षात करायचा.
नेहमीप्रमाणे शनिवारी हात बांधून चेहऱ्यावरील रुमाल काढण्याचा टास्क पूर्ण नादात गळफास लागला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपास पुढं आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
टास्क पूर्ण करण्याच्या नादात माझ्या मुलाचा जीव गेला, अशा प्रकारच्या व्हिडीओवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी मुलाच्या वडिलांनी केली आहे. तसंच पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावं, असा सल्लाही त्यांनी दिला.
युट्युबवरील व्हिडिओ आणि चॅलेंज पूर्ण करणारे व्हिडिओ पाहण्याच्या नादात यापूर्वीही अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष देऊन मुलांना मोबाईलच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्याची गरज आहे.