नागपूर : नागपुरातून एक खळबळजनक माहिती समोर आलीय. काँग्रेस आमदाराच्या नावाने लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिलीप खोडे नावाच्या व्यक्तीला 25 लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. आरोपी दिलीप खोडे हा टेक्नीशियन पदावर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरात एसीबीने ही मोठी कारवाई केली आहे. नागपुरात एका महिला अधिकाऱ्याने आपल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून विनयभंग करण्यात आल्याची तक्रार केली होती. या महिला अधिकाऱ्याने काँग्रेस आमदार वजाहत मिर्झा यांच्याकडेही तक्रार केलेली. पीडित महिलेने संबंधित प्रकरणी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करावे आणि कारवाई करण्याची मागणी करावी, अशी विनंती केलेली. पण त्यानंतर धक्कादायक प्रकार बघायला मिळाला.
पीडित महिला अधिकाऱ्याने ज्या अधिकाऱ्यावर आरोप केले होते त्या अधिकाऱ्याने संबंधित प्रकरण मिटवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. संबंधित प्रकरणी कारवाई होऊ नये यासाठी त्या अधिकाऱ्याने प्रयत्न केले. पण हे प्रकरण मिटवण्यासाठी त्याच्याकडे काँग्रेस आमदार वजाहत मिर्झा यांच्या नावाने तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अखेर तडजोडी अंती हे 25 लाखांवर प्रकरण मिटवण्याचं ठरलं.
या सगळ्या घडामोडींदरम्यान संबंधित अधिकाऱ्याने एसीबी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची तक्रार देत सविस्तर माहिती दिली. एसीबी अधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार आज तक्रारदार व्यक्ती 25 लाख रुपये घेऊन आरोपीला द्यायला गेला. तक्रारदाराने आरोपीला पैसेही दिले. पण त्याचवेळी एसीबीने छापा टाकला आणि आरोपीला जेरबंद करण्यात आलं. या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. शेखर भोयर असं या दुसऱ्या अटकेतल्या आरोपीचं नाव आहे.
आता या सगळ्या प्रकरणात काँग्रेस आमदार वजाहत मिर्झा यांचीदेखील चौकशी होण्याची शक्यता आहे. कारण आरोपीने आमदाराच्या नावाने तब्बल 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. पीडित महिलेने आमदाराकडे तक्रार केली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता काँग्रेस आमदार वजाहत मिर्झा यांचीदेखील चौकशी होते का? याबाबतची माहिती लवकरच समोर येईल.