गोंदिया : चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना बेदम मारहाण करणं पोलिसांच्या अंगाशी बेतलं आहे. आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाल्याने आरोपीच्या बहिणीने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्यात आलं. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी केलेल्या तपासात पोलीस निरीक्षकासह, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह तीन पोलीस शिपाई हे दोषी असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे सीआयडीने पाचही पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. सीआयडीने आरोपींना न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयाने आरोपींना 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे आरोपींमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक हा पसार झाला आहे (CID file case against five cops who allegedly murder accused in Gondia).
नेमकं प्रकरण काय?
आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कुंभारटोली जिल्हा परिषद शाळेत तीन चोरट्यांनी 20 मे रोजी दरोडा घातला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली. गुन्हे शाखेने 21 मे रोजी आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले. पण पोलिसांनी आरोपींना बेदम मारहाण केलं. या मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू झाला. या आरोपीचं नाव राजकुमार धोती असं होतं. याप्रकरणी आरोपीच्या बहिणीने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांनीच तिच्या भावाचा खून केला, असा आरोप तिने केला होता (CID file case against five cops who allegedly murder accused in Gondia).
सीआयडीच्या तपासात पोलीस दोषी असल्याचं सिद्ध
दरम्यान, मृतक राजकुमार धोती याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचं उघड झालं. त्यामुळे त्याला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. हे प्रकरण जास्त तापल्याने अखेर सीआयडीकडे तपासाचे सूत्र देण्यात आले. सीआयडीने केलेल्या तपासात संबंधित पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे दोषी असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे सर्व दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींना अखेर बेड्या
महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकाच वेळेला एकाच पोलीस ठाण्यात इतक्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष चौहान, सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके, दत्तातय कांबळे यांच्या विरोधात कलम 302, 330, 334 अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. तर पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.