तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच भंडाऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्याचाही खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला येथील उपसरपंचांची चाकूने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा आरोप केला जात आहे.
काय आहे प्रकरण?
घराशेजारी असलेल्या लोकांसोबत आरोपीचे जुने भांडण होते. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपी हे दवडीपार बेला येथील उपसरपंच दिनेश बांते यांच्या घरी गेले. घरी जाऊन त्यांनी बांते यांच्या शरीरावर चाकूने वार केला. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले.
दिनेश बांते यांचा मृत्यू
दिनेश बांते यांना रुग्णवाहिकेतून भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती भंडारा शहर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.
कोण होते दिनेश बांते?
दिनेश बांते हे भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला येथील उपसरपंच होते. त्याचप्रमाणे ते शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. घरात घुसून शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बांते यांची हत्या करणाऱ्या आरोपींचा तपास पोलीस करत आहेत.
नाशकात भाजप पदाधिकाऱ्याची हत्या
दुसरीकडे, नाशिकमधील (Nashik) सातपूरचे भाजप (BJP) मंडल अध्यक्ष अमोल इघे (Amol Ighe Murder) यांच्या निर्घृण हत्येनंतर स्थानिक राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यातच इघेंची हत्या करणारा संशयित आरोपी हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
शुक्रवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अमोल इघे यांना फोन केला. त्यांना घराबाहेर बोलावून धारदार शस्त्राने वार करत इघेंची निर्घृण हत्या केली होती. संशयित आरोपी हा राष्ट्रवादीच्या कामगार वंचित आघाडीचा पदाधिकारी असल्याचं बोललं जातं. त्याने महिन्याभरापूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
संबंधित बातम्या :
भाजप पदाधिकारी अमोल इघे हत्या प्रकरण, संशयित आरोपी महिन्याभरापूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत?
नाशकात भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या, चार दिवसात जिल्ह्यात तिसरा खून