तेजस मोहतुरे, टीव्ही९ मराठी, भंडारा : धावत्या रेल्वेतून पडून माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नागपूरहून रेवा येथे जाताना रात्रीच्या वेळेस भंडारा जिल्ह्याच्या देव्हाडा-माडगी वैनगंगा नदी पुलावर ही घटना घडली. पूजा इशांत रामटेके (27 वर्ष) आणि त्यांचा 18 महिन्यांचा मुलगा (रा. टेकानाका, नागपूर) यांचा घटनेत बळी गेला.
सैनिक शाळेत शिक्षक असलेला इशांत रामटेके (रा. टेकानाका, नागपूर) हा सुट्टी संपल्याने कुटुंबासह नागपूर रेल्वेस्थानकावरुन रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने निघाला होता.
तुमसर रेल्वे स्थानकावरुन गाडी पुढील प्रवासाला निघाली असताना पत्नी पूजा ट्रेनमधील स्वच्छतागृहात निघाली. पतीला सांगून ती दीड वर्षाच्या मुलासह रेल्वे डब्यातील शौचालयाकडे गेली. त्यावेळी मुलगा धावत-धावत समोर गेला आणि काही कळण्याच्या आतच माडगी आणि देव्हाडा दरम्यान वैनगंगा नदी रेल्वे पुलावरुन नदीत पडला.
मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात महिलेचा तोल जाऊन तीसुद्धा रेल्वे पुलावर कोसळली. या घटनेत दीड वर्षांच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर महिलेला पुलाचा मार लागून ती मृत्युमुखी पडली. ही घटना रात्रीच्या वेळेस घडल्याची प्राथामिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
बराच वेळ झाल्यानंतरही पत्नी आणि मुलगा परत न आल्याने पतीने धावत्या रेल्वेत शोधाशोध केली. परंतु शोध न लागल्याने त्याने गोंदिया येथे पत्नी आणि मुलगा हरवल्याची तक्रार नोंदविली. मात्र सोमवारी रेल्वे कर्मचारी पेट्रोलिंगवर असतांना त्यांना एका महिलेचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत, तर मुलाचा मृतदेह नदीत आढळून आला.
या घटनेची माहिती रेल्वे पोलीस आणि करडी पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. इशांत रामटेके यांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर येथे पाठवण्यात आले. पुढील तपास करडी पोलीस करत आहेत.
संबंधित बातम्या :
मुंबईतील भाजप नेत्याच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, रेश्मा खानवर कारवाईची टांगती तलवार
सलूनमध्ये नंबर लावण्यावरुन वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी, वाहनांची तोडफोड, नगरमध्ये पोलीस बंदोबस्त
पोलिसाकडून विवाहितेवर 6 वर्षांपासून बलात्कार, पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी