300 कोटीच्या संपत्तीसाठी हत्या नाहीच?, नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट; कारण काय?

| Updated on: Jun 12, 2024 | 7:50 PM

पुरुषोत्तम पुट्टेवार यांची 22 मे रोजी हत्या झाली. कारने उडवल्याने पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचं दिसून आलं. पण नंतर सूनेनेच सासऱ्याचा काटा काढल्याचं उघड झालं. आधी पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या 300 कोटीच्या संपत्तीसाठी ही हत्या झाल्याचं सांगितलं जात होतं. पण आता पोलीस तपासात वेगळीच माहिती उघड झाली आहे.

300 कोटीच्या संपत्तीसाठी हत्या नाहीच?, नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट; कारण काय?
Purushottam Puttewar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूरच्या हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या हत्या प्रकरणाची मास्टरमाइंड अर्चना पुट्टेवार हिलाही अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला ही हत्या 300 कोटीच्या संपत्तीसाठी झाल्याची चर्चा होती. मात्र, आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पुरुषोत्तम पुट्टेवार यांची संपत्ती 300 कोटींची नव्हती. तर त्यापेक्षा कमी होती. पुरुषोत्तम यांच्या संपत्तीसाठी त्यांची हत्या करण्यात आली नाही. तर माहेरच्या संपत्तीतील वाट्यात सासरा अडथळा ठरत होते, म्हणूनच सासरे पुरुषोत्तम यांची हत्या अर्चनाने घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे.

पुरुषोत्तम पुट्टेवार यांची संपत्ती 300 कोटीची असल्याचं सांगितलं जात होतं. पण पोलिसांच्या तपासातून वेगळी माहिती आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार पुट्टेवार यांची संपत्ती 20 ते 22 कोटी इतकी आहे. पण ही हत्या पुरुषोत्तम यांच्या संपत्तीसाठी झालीच नव्हती. हत्येचं कारण वेगळं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. हे कारण ऐकल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

काय आहे प्रकरण?

पुरुषोत्तम पुट्टेवार यांना डॉ. मनीष, हेमंत आणि योगिता अशी तीन मुलं आहेत. तिघांचीही लग्न झालेलं आहे. अर्चना ही मनीष यांची बायको आहे. अर्चना, प्रशांत आणि प्रवीण हे बहीण-भाऊ आहेत. योगिताचे अर्चनाच्या भावासोबत म्हणजे प्रवीणसोबत लग्न झालं होतं. पण नवऱ्याचं निधन झाल्याने योगिता माहेरीच राहते. योगिताने सासरकडे संपत्तीत वाटा मागितला होता. ते प्रकरण कोर्टात आहे. योगिताचे वडील पुरुषोत्तम हे कोर्टात पाठ पुरावा करत होते. त्यामुळे पार्लेवार कुटुंबातील संपत्ती योगिताचा तिसरा हिस्सा होणार होता. म्हणजे पार्लेवार कुटुंबातील संपत्तीत अर्चना आणि प्रशांत यांना कमी वाटा मिळणार होता. त्यामुळेच या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या पुरुषोत्तम यांचा काटा काढण्यात आल्याचं समोर आलं आहे.

या कुटुंबाची नागपूरच्या ऊंटखाना परिसरात 6 हजार स्क्वेअर फूट जमीन आहे. या जमिनीवर अर्चना आणि प्रशांतला मॉल बनवायचा होता. पण योगिता आणि पुरुषोत्तमने त्यावर केस दाखल केली होती, म्हणूनच अर्चनाला मोठ्या अडचणी येत होत्या.

अर्चनाची संपत्ती किती?

नगर रचना विभागात काम करत असताना अर्चनाने मोठी माया जमा केल्याचं समोर आलं आहे. तिच्या बैरामजी टाऊनमधील फ्लॅटमध्ये पायल नागेश्वर राहते. अर्चनाचे दोन फ्लॅट आहेत. तिचा एक फार्म हाऊस आहे. तसेच तिने अनेक ठिकाणी बेनामी मालमत्ता खरेदी केल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचीही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सोन्याचे बिस्कीट, बांगड्या जप्त

सासऱ्याचा खून करण्यासाठी अर्चनाने एक कोटी रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी 17 लाख रुपये आरोपींना दिले होते. यात एक 40 ग्रॅम सोन्याची बांगडी, 100 ग्रॅम सोन्याचे बिस्कीट दिले होते. पोलिसांनी हा संपूर्ण ऐवज ताब्यात घेतला आहे.