नागपूर : दारूच्या वादातून युवकाची दगडाने डोक्याला ठेचून हत्या करण्यात आली. वाडीच्या स्मृतीनगर येथील संजयसिंग गौर (वय 44) असे मृतकाचे नाव आहे. वाडीतील कियो शोरूमच्या गोदामाजवळ ही घटना गुरुवारी (11) घडली.
संजय हा त्याच्या भावासह दत्तवाडी येथे भाड्याची खोली करून राहत होता. आयकॉन इंडस्ट्रीजच्या ऑटोमोबाईल सेक्सशनमध्ये तो काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, संजय 10 नोव्हेंबर रोजी बालाघाट येथे मामाकडे वास्तूपूजनाच्या कार्यक्रमाला गेला होता. सीताबर्डी येथील रेल्वेस्थानकावर आल्यानंतर ऑटोने तो वाडीकडे येण्यास निघाला. दरम्यान, त्याने दारू घेतली असल्याचा अंदाज आहे. संजय हा मद्यपी असल्याची माहिती आहे. दरम्यान, ऑटोत वाडीलाच जाणाऱ्या काही खोडकर मुलांबरोबर त्याचा वाद झाला. त्यांनीच त्याचा गेम केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीला गोदामाच्या मागे रक्तबंबाळ अवस्थेत एक मृतदेह सापडला. दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याचे दिसत होते. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतकाच्या खिशातील कागदपत्रांवरून त्याची ओळख पटली. कंपनीच्या मालकाने त्याला ओळखत असल्याचं सांगितलं. कुणासोबत तरी त्याचा वाद झाला असावा, त्यातून ही घटना घडली असावी, असं त्यांनी सांगितलं.
मृतक संजयच्या खिशातील मोबाईल तसेच पाकीट गायब आहे. यावरून चोरीच्या हेतूने त्याचा खून केला असल्याची दुसरी शक्यताही वर्तवली जाते. घटनास्थळाच्या बाजूला एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्यात काही दृश्य बंद झाली आहेत.
संतोष गडेकर आणि त्याचे मित्र घटनास्थळाजवळ दारू पित होते. त्यादरम्यान दारूच्या वादातून त्याचा खून झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी संशयावरून कळमना येथून दोघांना अटक केली आहे. त्यांची विचारपूस केल्यानंतर सत्य काय आहे ते बाहेर येईल, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.
इतर बातम्या
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा अजून तीन दिवस कोठडीत मुक्काम; 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी वाढवली