नागपूर : देवलापारवरून काम संपवून नागपूरकडे परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. ट्रॅव्हल्सनं बाईकला धडक दिल्यानं गोपीचंद कांबळे (वय 51) हे घटनास्थळीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी, 12 नोव्हेंबर रोजी घडली.
प्राप्त माहितीनुसार, गोपीचंद कांबळे हे शुक्रवारी सकाळी देवलापारवरून नागपुरातील डिगडोहकडे बाईकने परत येत होते. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर डुमरी स्टेशनजवळ महामार्गाचे काम सुरू आहे. यामुळं एकाच बाजूचा रस्ता सुरू आहे. डुमरी स्टेशनजवळ नागपूरकडून जबलपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकाने गोपीचंद यांच्या बाईकला धडक दिली. या अपघातात गोपीचंद यांच्या डोकं, दोन्ही हात आणि पायाला गंभीर मार लागला. रक्तस्त्राव झाल्यानं गोपीचंद यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कन्हानचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह कामठी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. राहुल रंगारी यांच्या तक्रारीवरून ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामटेकच्या अंबाला तलावात नागपुरातील हिवरीनगरचा आर्यन गडरिया (वय 19) याचा शुक्रवारी, 12 नोव्हेंबरला बुडून मृत्यू झाला. तो आपल्या कुटुंबीयांसोबत आजोबाच्या दशक्रिया विधीसाठी गेला होता. दुपारी एक वाजता तीन मित्र आंघोळीसाठी तलावात उतरले. हिमांशू सांडेल व मानव जागेश्वर हे बाहेर निघाले. पण, आर्यनला पोहता येत नसल्यानं तो पाण्यातून बाहेर निघू शकला नाही. मासेमाऱ्यांच्या मदतीनं आर्यनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील पारडीचा निकेश वेलेकर (वय 31) हा आजीच्या राख विसर्जनासाठी कन्हान नदीच्या बिना संगमवर गेला होता. 11 नोव्हेंबरला दुपारी राख विसर्जन झाल्यावर नदीत आंघोळीसाठी निकेश नदीत उतरला. पाण्यासोबत वाहू लागल्यानं त्याने आरडाओरड केली. परंतु, मदतीसाठी कोणी जाईपर्यंत निकेशचा जीव गेला होता. नाकातोंडात पाणी गेल्यानं त्याचा मृत्यू झाला. खापरखेडा पोलीस तपास करीत आहेत.