सुनील ढगे, Tv9 मराठी, नागपूर | 27 डिसेंबर 2023 : पोलीस आपली सुरक्षा करतात. ते सदैव देशासाठी तत्पर असतात. ते खून, दरोडा, चोऱ्या करणाऱ्यांच्या मुसक्या आवळतात. पोलीस महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांच्या नांग्या ठेचतात. ते गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरतात. त्यामुळे गुन्हेगारांच्या मनात पोलिसांमुळे धडकी भरते, असं आपण म्हणतो. पण नागपुरात एक विचित्र प्रकार समोर आला आहे. नागपुरात पोलिसाच्या घरातून त्याची पिस्टल आणि 30 गोळ्या चोरील्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे चोरट्याची हिंमत इतकी मोठी की त्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या घराचे कुलूप तोडलं. संपूर्ण घरात शोधाशोध केली. कपाटातील पिस्टल आणि तिथे ठेवलेल्या जिवंत 30 काडतुसे घेतले आणि तिथून पसार झाला. आता हे पिस्टल कोणाच्या हाती पडलं असेल? हा मोठा सवाल आहे. नागपुरात आधीच गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत असताना, अशाप्रकारे पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून पिस्टल आणि जिवंत काडतुसची चोरी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नागपुरात राज्य राखीव पोलीस दलाच्या कमांडंटच्या गनमॅनचे बंदुकीच्या 30 गोळ्यासह पिस्टल चोरीला गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी पोलीस वसाहतीतील घरात घुसून पिस्टल आणि काडतूस पळविले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनाच चोरटे आव्हान देत असल्याचे चित्र आहे.
राज्य राखीव पोलीस दलातील पोलीस जवान मंगेश लांजेवार जवानांच्या वसाहतीत राहतात. लांजेवार हे एस.आर.पी.एफ. गट क्र. 4 च्या समादेशक प्रियंका नारनवरे यांचे गनमॅनपदी कार्यरत आहे. मंगेश लांजेवार हे त्यांचे पिस्टल आणि 30 जिवंत काडतूस घरी ठेवून, साप्ताहिक सुटी असल्याने भंडारा येथे गेले होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून आलमारीचे कुलूप तोडले. त्यानंतर चोरट्यांनी आत असलेले पिस्टल आणि 30 जिवंत काडतूस चोरून नेले.
मंगेश हे नागपूरला परत आले असता, त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलले, पिस्तूल आणि काडतुसे गायब असल्याचे दिसले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे यापूर्वी नागपूर शहरातील एका ठाणेदाराचेही सर्व्हिस रिव्हॉल्व्हर चोरीला गेले आहे. त्याचाही अद्याप शोध लागलेला नाही.