सुनील ढगे, Tv9 मराठी प्रतिनिधी, नागपूर : लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोन दिवसांपूर्वी दरोडा पडला. यात एका व्यक्तीकडून वीस लाख रुपये लुटण्यात आले. पोलिसांनी तपास केला. दरोडा टाकणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणात आठ आरोपींना ताब्यात घेतलं. 14 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. नागपुरातील या मोठा दरोड्याचा खुलासा आज पोलिसांनी केला.
नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत दोन दिवसांपूर्वी मोठी घटना घडली. परवा रात्री एका व्यापाऱ्याचा कर्मचारी लॉकरमध्ये पैसे ठेवण्यासाठी जात होता. दिवसभराच्या धंद्याचे पैसे होते.
पाच ते सहा जणांनी त्याच्यावर भर रस्त्यात हल्ला चढविला. त्याच्याजवळ असलेले वीस लाख रुपये कॅश लुटली. घटनास्थळावरून आरोपी फरार झाले. मात्र घटना मोठी असल्याने पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला.
सीसीटीव्हीचा आधार घेत पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, काही लोक बॅगमध्ये कॅश घेऊन जात आहेत. त्यावरून पोलीस आणि क्राइम ब्रँचने सापळा रचला.
पोलिसांनी आठ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली. तपास केला असता त्यांच्याजवळ 14 लाख रुपये नगदी कॅश सापडली. ती पोलिसांनी हस्तगत केली आहे.
हा संपूर्ण दरोड्याचा प्रकार टीपच्या आधारावर झाला. असंसुद्धा पोलिसांच्या तपासात समोर आलं. ज्या व्यापाऱ्याची ही कॅश होती तिथल्याच कोणीतरी ही टीप दिलेली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या दरोडेखोरांनी दरोड्याच्या आधी संपूर्ण परिसराची रेकी केली होती. संधी साधत दरोडा घातला. या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी चिन्मय पंडित यांनी दिली.
या प्रकरणात आणखी कोणी गुंतला आहे का, याचा सुद्धा बारकाईने तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. नागपूर पोलिसांची ही मोठी कारवाई आहे. भर रस्त्यावर टाकलेल्या दरोड्यानं पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. परंतु, पोलिसांनी याचा पर्दाफाश केला.