यवतमाळ हादरलं! झोपी गेलेल्या शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून

| Updated on: Nov 29, 2022 | 9:47 AM

ते शेतात गेले, तिथेच झाडाखाली झोपले! सकाळ झाली तेव्हा जे दिसलं, ते पाहून उडाली खळबळ

यवतमाळ हादरलं! झोपी गेलेल्या शेतकऱ्यावर धारदार शस्त्राने वार करुन खून
धक्कादायक हत्याकांड
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याची हत्या करण्यात आली. सकाळी जेव्हा शेतकऱ्याची पत्नी नेहमीप्रमाणे शेतात गेली, तेव्हा पतीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून ती हादरुनच गेली. हत्येच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय. याप्रकरणी पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. नेमकी ही हत्या कुणी केली, का केली, याचं गूढ उकलण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय. महागाव तालुक्यातील काळी दौलत खान शिवारात हे हत्याकांड घडलं. या घटनेत हत्या झालेल्या शेतकऱ्याचं नाव बबन वसंत राऊत असं आहे. ते 49 वर्षांचे होते.

बबन राऊत हे नेहमीप्रमाणं आपल्या शेतात गेले होते. पिकांची राखण करण्यासाठी आणि कपाशीला पाणी देण्यासाठी ते शेतात गेले. रात्री ते शेतातच थांबले. शेतातील एका झाडाखाली ते झोपी गेले.

दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास बबन यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बबन यांचा मृत्यू झाला.

रात्री घडलेल्या या घटनेनंतर ते सकाळपर्यंत रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. रविवारी रात्री हे हत्याकांड घडलं. सोमवारी सकाळी हत्येची ही घटना उघडकीस आली.

बबन यांची पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेली. पण त्याआधी बबन यांच्या मुलाने त्यांना मोबाईल फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा फोन बंद होता. अखेर पत्नी शेतात गेल्यानंतर जे दिसलं, त्याने ती हादरुनच गेली.

त्यानंतर या घटनेची माहिती पुसद येथील ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. शेतीच्या वादातून ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला जातोय. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

या हत्याकांडानंतर मृत बबन यांचा सख्खा लहान भाऊ फरार आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. या हत्येशी बबन यांचा सख्खा लहान भाऊ शिवाजी राऊत यांचाही काही संबंध तर नाही ना? अशी शंकाही उपस्थित केली जातेय. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.