शैलेश पुरोहित, Tv9 मराठी, नाशिक | 18 जानेवारी 2024 : मुंबई-आग्रा महामार्गाने दररोज लाखो वाहनं धावतात. या महामार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. कारण या महामार्गावरुन वेगवेगळ्या महत्त्वाच्या शहरांपर्यंत रस्ता जातो. याच महामार्गावर मुंबई-नाशिक दरम्यान सशस्त्र दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई-नाशिक महामार्गावर रात्रीच्यावेळी गाड्या अडवून दरोडा पडल्याची घटना घडली होती. आतादेखील तशाच एका घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. त्यामुळे आरोपींना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई-नाशिक महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे.
सोने आणि चांदीचे दागिने घेऊन जाणाऱ्या बजरंग कुरिअर सर्व्हिसच्या इको गाडीवर 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र दरोडा टाकला. आरोपींनी फिल्मी स्टाईलने माणिकखांब जवळ गाडीच्या पुढे आणि मागे गाडी आडवी लाऊन दरोडा टाकला. आरोपींनी गाडीतील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून 3 कोटी 67 लाख 55 हजारांचा ऐवज चोरुन नेला. आरोपी दरोडेखोरांनी लुटलेल्या ऐवजमध्ये साडेतीन किलो सोन आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. यटा दरोड्याच्या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर अतिशय फिल्मी स्टाईल दरोड्याचा प्रकार घडला आहे. मुंबईहून सोन्याची बिस्किटे, दागिने आणि चांदी असा 3 कोटी 67 लाख 55 हजारांचा ऐवज घेऊन एक ओमनी गाडी धुळ्याच्या दिशेला जात होती. बजरंग कुरिअर सर्व्हिसची ही गाडी होती. ही गाडी धुळ्याला डिलिव्हरीसाठी जात होती. या दरम्यान माणिकखांब जवळ चार ते पाच अज्ञात आरोपींनी गाडीला अडवलं.
आरोपींनी शस्त्रांचा दाख दाखवत गाडीतील ड्रायव्हर आणि त्याच्यासोबतच्या एका सहकाऱ्याला गाडीतून खेचलं. त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. यानंतर आरोपींनी गाडीतील सर्व कोट्यवधींचा ऐवज लुटून नेला. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरातील ही तिसरी घटना घोटी पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.
या प्रकरणातील आरोपी कोण असतील? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय. आरोपींना संबंधित गाडीत सोने-चांदी असल्याची माहिती असल्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.