नाशिक : क्लासच्या फी साठी आणलेले पैसे हरवल्याने मानसिक ताण येऊन एका महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. श्रुती सानप असे मयत विद्यार्थीनीचे नाव आहे. श्रुती ही नाशिकच्या सप्तश्रृंगी आयुर्वेद महाविद्यालयात शिकत होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
श्रुती ही मूळची बीड जिल्ह्यातील असून ती शिक्षणासाठी नाशिक येथे राहत होती. नाशिकच्या सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयात बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात श्रुती शिकत होती. दोन दिवसांपूर्वीच ती आपल्या मूळगावावरुन नाशिकमध्ये आपल्या हॉस्टेलवर परतली होती. येताना तिने क्लासच्या फी साठी आई वडिलांकडून सहा हजार रुपये आणले होते. मात्र हे पैसे तिच्याकडून प्रवासा दरम्यान हरवले. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. याच तणावातून तिने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलीस तपासात समोर आला आहे.
श्रुतीने हॉस्टेलमधील तिच्या राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली असून याप्रकरणी पंचवटी पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंचवटी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. मात्र तिच्या अशा मृत्यूने शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील दबक्या आवाजात चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, प्राणायम करताना छातीत दुखून एका 30 महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनाही आज नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. सोनल आव्हाड असे मयत महिलेचे नाव असून त्या नाशिकमधील मखमलाबाद परिसरात राहतात. गुरुवारी सकाळी सोनल नेहमीप्रमाणे प्राणायम करीत होत्या. यावेळी त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सोनल यांचा मृत्यू निमोनिया आणि फुफ्फुसाच्या आजाराने झाल्याचं शव विच्छेदन अहवालात समोर आलं आहे. (College girl commits suicide due to mental stress due to loss of fees)
इतर बातम्या
Pandharpur Crime: पंढरपूरचे ‘ते’ प्रकरण मानवतेला काळीमा फासणारे; राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल
Kalyan Crime: जाहिरातीचा व्हिडिओ करण्यास नकार दिल्याने तरुणीला अश्लील व्हिडिओ कॉल करुन विनयभंग